कुणबी समाजात विष पेरणाऱ्यांना रामदास कदमांचा इशारा; म्हणाले, राजकीय पोळी भाजू देणार नाही!

मराठा आरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयात लढा दिल्याची आठवण; कुणबी समाजाची दिशाभूल करणाऱ्यांवर निशाणा

खेड : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत केलेल्या ५०० कोटी रुपयांच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी आपण सर्वोच्च न्यायालयात लढा दिला असून, ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळावे, हीच आपली भूमिका असल्याचे कदम यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले.
कुणबी समाजामध्ये आपली प्रतिमा मलिन करण्यासाठी काही मंडळी जाणीवपूर्वक प्रयत्न करीत असल्याचा आरोप करत, दोन समाजांमध्ये दुही निर्माण करून राजकीय स्वार्थ साधण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आपण कुणबी समाजाच्या विरोधात लढत असल्याचे चित्र निर्माण करून समाजाची दिशाभूल केली जात आहे. मात्र, अशा अपप्रचाराला आपण बळी पडणार नसल्याचा इशाराही कदम यांनी दिला.
कुणबी समाजाच्या प्रश्नांवर आपली भूमिका स्पष्ट असल्याचे सांगताना रामदास कदम यांनी आपण दुटप्पी भूमिका घेत नसल्याचे नमूद केले. कुणबी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आपण आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम प्रयत्नशील असल्याचे त्यांनी म्हटले. खोटे आरोप करून समाजामध्ये गैरसमज पसरविणे आणि त्यातून राजकीय पोळी भाजून घेणे, असे प्रयत्न करणाऱ्यांना यश मिळणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
ज्या समाजाने आपल्यावर आणि योगेश कदम यांच्यावर विश्वास ठेवला आहे, त्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही, अशी ग्वाही रामदास कदम यांनी दिली. कुणबी समाजातील बांधवांनी कोणत्याही अफवांना बळी न पडता वस्तुस्थिती समजून घ्यावी. समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या वक्तव्यांपासून सावध राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.
दरम्यान, दीपावलीच्या पार्श्वभूमीवर रामदास कदम यांनी सर्व समाजबांधवांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. समाजातील सलोखा, परस्पर विश्वास आणि एकोपा कायम राखण्याचे आवाहन करत, समाजामध्ये विष पेरून राजकीय स्वार्थ साधण्याचा प्रयत्न हाणून पाडण्याची भूमिका त्यांनी मांडली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button