रत्नागिरी येथील जयगडजवळ जहाजबांधणीसाठी बंदर उभारण्यात येणार -मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे


सरकारने बंदरे विकासात महत्त्वाचे पाऊल टाकले असून याअंतर्गत आता सरकार स्वत:च्या मालकीची बंदरे उभारणार आहे. पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथे या बंदरांचा विकास करण्यात येणार असून यामाध्यमातून सरकारला १० हजार कोटींचे उत्पन्न मिळणार असल्याची माहिती मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी दिली.राज्यात सध्या ४८ बंदरे आहेत. यातील बहुतांशी बंदरे ही खासगी मालकीची असल्याने राज्य सरकारला मिळणारे उत्पन्न हे मर्यादित आहे. यातून सरकारला केवळ २५८ कोटींचा महसूल मिळतो. मात्र आता राज्य सरकार पूर्णपणे स्वत:च्या मालकीची चार बंदरे विकसित करणार आहे. या माध्यमातून राज्य सरकारला ६ ते १० हजार कोटींचा महसूल मिळेल. सोबतच ३० ते ३५ हजारांचा रोजगारही उपलब्ध होईल.

रत्नागिरीत होणार जहाजबांधणी

गोव्याप्रमाणे महाराष्ट्रातही जहाजबांधणीसाठी बंदर उभारण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. रत्नागिरी येथील जयगडजवळ जहाजबांधणीसाठी बंदर उभारण्यात येणार आहे. यातून स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार असल्याचे नितेश राणे म्हणाले.महाराष्ट्र सागरी मंडळासाठी (मेरिटाईम बोर्ड) नवीन धोरण तयार होत आहे. आता ते शेवटच्या टप्प्यात आले आहे. येत्या हिवाळी अधिवेशनापूर्वी ते मंत्रिमंडळ मंजुरीसाठी सादर करण्याचा आपला प्रयत्न असणार आहे. या माध्यमातून मोठया प्रमाणात गुंतवणुकीला चालना देण्यात येणार आहे. थेट परकीय गुंतवणुकीला देखील यात प्रोत्साहन देण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सागरी विभागासाठी अर्थसंकल्पात ७६ हजार कोटींचा निधी मंजूर केला आहे. त्याचा जास्तीत जास्त लाभ कसा मिळेल याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button