खेड-भरणे रस्त्यावरील नागमोडी गटाराच्या कामावर काँग्रेसचा संताप!

झाडाला वळसा घालून गटार बांधल्याने अपघाताचा धोका; संबंधित अभियंत्यांचा जाहीर सत्कार करण्याचा गौस खतीब यांचा उपरोधिक इशारा

खेड : खेड-भरणे मुख्य रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत (PWD) सुरू असलेल्या गटाराच्या कामावरून वाद निर्माण झाला आहे. रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला वळसा घालून नागमोडी पद्धतीने गटार बांधण्यात आल्याचा आरोप काँग्रेसचे गौस खतीब यांनी केला आहे. या कामामुळे रात्रीच्या वेळी दुचाकीस्वारांना गटाराचा अंदाज न आल्यास अपघात होण्याची शक्यता असून, संबंधित विभागाने तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
खेड-भरणे मुख्य रस्त्यावर सुरू असलेल्या गटाराच्या कामाची पाहणी केली असता हा धक्कादायक प्रकार निदर्शनास आल्याचे खतीब यांनी म्हटले आहे. रस्त्याच्या अगदी कडेला असलेल्या झाडाला वळसा घालून गटाराची बांधणी करण्यात आली आहे. त्यामुळे गटार सरळ रेषेत बांधण्याऐवजी नागमोडी स्वरूप आले असून, या कामाच्या नियोजनावर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
रस्त्याच्या कडेला अशा पद्धतीने गटार बांधल्यामुळे विशेषतः रात्रीच्या वेळी दुचाकीस्वारांना त्याचा अंदाज येणे कठीण होऊ शकते. परिणामी, वाहनचालकांचा तोल जाऊन ते थेट गटारात पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे संभाव्य अपघात टाळण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने सुरक्षेचे उपाय करावेत, अशी मागणी खतीब यांनी केली आहे.
या कामावर टीका करताना गौस खतीब यांनी संबंधित अभियंत्यांवर उपरोधिक शब्दांत निशाणा साधला. या आगळ्यावेगळ्या अभियांत्रिकी कामगिरीबद्दल खेड आणि चिपळूण सार्वजनिक बांधकाम विभागातील संबंधित अभियंत्यांचा काँग्रेस पक्षातर्फे लवकरच जाहीर सत्कार करण्यात येईल, असा टोला त्यांनी लगावला.
सार्वजनिक बांधकाम विभागाने या ठिकाणी तातडीने सुरक्षेच्या उपाययोजना कराव्यात आणि गटाराचे काम योग्य पद्धतीने करून ते सरळ रेषेत बांधावे, अशी मागणी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास काँग्रेस पक्ष तीव्र आंदोलन छेडेल, असा इशाराही गौस खतीब यांनी दिला आहे.
आता या प्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभाग कोणती भूमिका घेतो आणि गटाराच्या बांधकामात आवश्यक सुधारणा केल्या जातात का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button