सुरक्षित बचपन अभियाना’चा दिमाखात शुभारंभ; रा. भा. शिर्के प्रशालेत जनजागृती कार्यक्रम संपन्न

रत्नागिरी, दि. २६ ) : बालकांवरील लैंगिक अत्याचाराच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार अखिल भारतीय स्तरावर ‘सुरक्षित बचपन’ जनजागृती अभियान हाती घेण्यात आले आहे. या अभियानाचा पहिला टप्पा २६ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर दरम्यान प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. वाय. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली राबविला जात आहे. या देशव्यापी मोहिमेचा शुभारंभ रा. भा. शिर्के प्रशालेत एका विशेष कार्यक्रमाद्वारे उत्साहात आज करण्यात आला.
या शुभारंभ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान जिल्हा न्यायाधीश ए. एम. अंबाळकर यांनी भूषविले. यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव राजेंद्र रा. पाटील आणि जिल्हा बाल कल्याण समितीच्या सदस्य प्रिया लोवलेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या.
कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक के. डी. कांबळे, शिक्षकवृंद तसेच सुमारे २०० विद्यार्थी उपस्थित होते.
‘मेरा बचपन मेरा अधिकार’चा दिला संदेश
कार्यक्रमादरम्यान ‘मेरा बचपन मेरा अधिकार’ हा महत्त्वपूर्ण संदेश देण्यात आला. अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना जिल्हा न्यायाधीश श्री. अंबाळकर म्हणाले, “वैयक्तिक सुरक्षितता ही प्रत्येकासाठी अत्यंत महत्त्वाची बाब आहे. बालकांनी सदैव जागरूक व सावध राहिले पाहिजे. कोणतीही अनुचित किंवा गैर घटना घडण्यापूर्वीच मुलांनी आवाज उठवला पाहिजे. कोणत्याही प्रकारचा त्रास देणाऱ्या व्यक्तीविषयी आपल्या आई-वडिलांना किंवा शिक्षकांना न घाबरता, निसंकोचपणे सांगावे.”
सप्ताहभरात विविध शाळांमध्ये जनजागृतीचे आयोजन
या अभियानांतर्गत ‘बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायदा २०१२’ (पॉक्सो) याविषयी शाळांमध्ये व्याख्याने, चर्चासत्रे, रॅली आणि भित्तीचित्रांच्या माध्यमातून जनजागृती केली जाणार आहे. यात केवळ विद्यार्थीच नव्हे; तर पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, वसतिगृह अधीक्षक, स्कूल बस चालक आणि सफाई कामगार या सर्वांना कायद्याच्या तरतुदी समजावून सांगितल्या जातील. न्यायाधीश, वकील, बाल कल्याण समिती सदस्य, बाल संरक्षण अधिकारी, मानसोपचारतज्ज्ञ, सायबर तज्ज्ञ आणि विशेष पोलीस पथक या मोहिमेत मार्गदर्शन करणार आहेत.
पुढील कार्यक्रमांचे वेळापत्रक:
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव श्री. पाटील यांनी सर्व पालकांनाही या जनजागृती सत्रांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. शहरातील पुढील शाळांमध्ये हे कार्यक्रम होणार आहेत:

  • २७ ऑक्टोबर : सकाळी १०:०० वाजता – सौ. गोदुताई जांभेकर विद्यालय, रत्नागिरी
  • २८ ऑक्टोबर : दुपारी ०२:१५ वाजता – फाटक हायस्कूल, रत्नागिरी
  • २९ ऑक्टोबर : सकाळी ०९:३० वाजता – जी. जी. पी. एस. इंग्लिश मीडियम हायस्कूल, रत्नागिरी
  • ३० ऑक्टोबर : दुपारी ०२:०० वाजता – ए. ए. देसाई हायस्कूल, रत्नागिरी
  • ३१ ऑक्टोबर : सकाळी ०९:३० वाजता – दामले हायस्कूल, रत्नागिरी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button