रत्नागिरीच्या नूतन भाजी मार्केटचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते लोकार्पण


श्री नवलाई देवी भाजी मंडई’ नामकरणाची सूचना; जुन्या विक्रेत्यांना न्याय देण्याचे प्रशासनाला निर्देश*


रत्नागिरी, दि. १७ : रत्नागिरी शहरातील बाजारपेठ परिसरात नव्याने उभारण्यात आलेल्या भाजी मार्केटच्या इमारतीचे लोकार्पण पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. सुमारे तीन कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या या इमारतीला ‘श्री नवलाई देवी भाजी मंडई’ असे नाव देण्याची सूचना त्यांनी केली. तसेच, स्टॉल वाटपाच्या प्रक्रियेत वर्षानुवर्षे व्यवसाय करणाऱ्या जुन्या विक्रेत्यांवर अन्याय होणार नाही, याची खबरदारी घेण्याचे निर्देशही त्यांनी प्रशासनाला दिले.

नगरपरिषदेच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत उभारण्यात आलेल्या या इमारतीचे कोनशिलेचे अनावरण आणि फीत कापून उद्घाटन करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे, मुख्याधिकारी वैभव गारवे, उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर, जिल्हा परिषद सदस्य बाबू म्हाप, माजी नगराध्यक्ष राहुल पंडित, बंड्या साळवी, ज्येष्ठ नगरसेवक राजन शेट्ये यांच्यासह लोकप्रतिनिधी, नगरसेवक आणि नागरिक उपस्थित होते.

जुन्या विक्रेत्यांच्या हिताला प्राधान्य द्या

भाजी मंडईतील स्टॉलचे वाटप करताना जुन्या स्टॉलधारकांना विश्वासात घेणे आवश्यक आहे. अनेक वर्षांपासून याच ठिकाणी व्यवसाय करून उदरनिर्वाह करणाऱ्या विक्रेत्यांना लिलाव प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी मिळाली पाहिजे. तसेच, गरजू व्यक्तींच्या हिताचे संरक्षण करून कोणावरही अन्याय होणार नाही, याची दक्षता प्रशासनाने घ्यावी, असे डॉ. सामंत यांनी स्पष्ट केले. बाजारपेठेतील नागरिकांच्या भावनांचा आदर करून मंडईला ‘श्री नवलाई देवी भाजी मंडई’ हे नाव देण्याबाबतही त्यांनी सूचना केली.

या नूतन इमारतीमुळे भाजी विक्रेत्यांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होण्यास मदत होईल. शहरातील बाजारपेठेच्या विकासाला चालना मिळण्याबरोबरच नागरिकांनाही अधिक सुसज्ज सुविधा मिळतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

शहराच्या विकासकामांचा घेतला आढावा

लोकार्पण सोहळ्यादरम्यान पालकमंत्री डॉ. सामंत यांनी रत्नागिरी शहरातील विविध विकासकामांचा आढावा घेत प्रशासनाला महत्त्वाच्या सूचना दिल्या.

शिवाजीनगर येथील स्मार्ट सिटी योजनेंतर्गत उभारण्यात आलेल्या बसथांब्याला ‘छत्रपती शिवाजी महाराज स्टॉप’ असे नाव देण्याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

शहरात नव्याने सुरू करण्यात आलेल्या ट्रक टर्मिनलचा योग्य वापर करण्यावरही त्यांनी भर दिला. नगरपालिकेला उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या २० नवीन वाहनांसह यंत्रसामग्रीच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी स्वतंत्र सर्व्हिसिंग सेंटर उभारण्याऐवजी ट्रक टर्मिनलच्या जागेचा वापर करावा. यामुळे अनावश्यक खर्च टाळून नगरपालिकेच्या निधीची बचत करता येईल, असे त्यांनी सांगितले.

कर उत्पन्नात वाढ; निधी विकासासाठी वापरणार

शहरातील इमारतींचे मॅपिंग पूर्ण झाल्यानंतर नगरपालिकेच्या कर उत्पन्नात दरवर्षी सुमारे साडेसात ते आठ कोटी रुपयांची अतिरिक्त वाढ अपेक्षित आहे. या वाढीव उत्पन्नाचा उपयोग शहरातील विविध विकासकामांसाठी करण्यात येईल, असे डॉ. सामंत यांनी स्पष्ट केले.

स्वच्छता कामगारांच्या कंत्राटासंदर्भातही त्यांनी महत्त्वाच्या सूचना केल्या. कंत्राटदाराने सर्व स्वच्छता कामगारांना वेळेवर योग्य वेतन देणे, गणवेश उपलब्ध करून देणे आणि त्यांच्या हक्कांचे संरक्षण करणे बंधनकारक असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. मुख्याधिकारी वैभव गारवे यांनी प्रास्ताविक केले, तर पूर्वा पेठे यांनी सूत्रसंचालन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button