
संगमेश्वरमध्ये भंगार गोदामाला भीषण आग; घरांसह दुकानांचे गाळे वाचविण्यात यश
संगमेश्वर येथे मारुती मंदिरासमोरील भंगार गोदामाला मध्यरात्री भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीमुळे परिसरात खळबळ उडाली. आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना रात्रभर शर्थीचे प्रयत्न करावे लागले. अखेर पहाटेपासून सकाळी ७ वाजेपर्यंत सुरू असलेल्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले.
या कारवाईदरम्यान परिसरातील घरे आणि दुकानांचे गाळे वाचविण्यात अग्निशमन दलाला यश मिळाले.
मिळालेल्या माहितीनुसार, संगमेश्वर येथील मारुती मंदिरासमोर अमित पासवान यांच्या मालकीच्या भंगार गोदामाला मध्यरात्री आग लागली. भंगार साहित्यामुळे आगीने जोर पकडल्याने ती विझविण्यासाठी अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना मोठी कसरत करावी लागली. आग आजूबाजूच्या घरांमध्ये आणि दुकानांमध्ये पसरण्याची शक्यता लक्षात घेऊन आग नियंत्रणात आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात आले.
या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी देवरुख येथील अग्निशमन बंब सर्वप्रथम घटनास्थळी दाखल झाला. त्यानंतर चिपळूण नगरपरिषद, रत्नागिरी एमआयडीसी आणि रत्नागिरी नगरपरिषद यांच्या अग्निशमन बंबांनीही घटनास्थळी धाव घेतली. एकापेक्षा अधिक अग्निशमन बंबांच्या मदतीने आग विझविण्याचे काम सुरू ठेवण्यात आले.
या बचावकार्यामध्ये अग्निशमन दलाचे मुकादम लिंगप्पा हळमणी, सागर तळेकर आणि आकाश करंडे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. मध्यरात्रीपासून सकाळपर्यंत सुरू असलेल्या प्रयत्नांमुळे आग नियंत्रणात आणता आली. परिसरातील घरे आणि दुकानांचे गाळे आगीच्या भक्ष्यस्थानी पडण्यापासून वाचविण्यात यश आल्याने मोठे नुकसान टळले.




