
मिऱ्या–नागपूर महामार्गावरील सर्व्हिस रोडच्या कामाला वेग
दर्जेदार डांबरीकरण आणि सुरक्षिततेवर भर देण्याची नागरिकांची मागणी

रत्नागिरी : मिऱ्या–नागपूर महामार्गावरील नाचणे ग्रामपंचायत हद्दीतील गणेश कॉलनी परिसरात अपूर्ण असलेल्या सर्व्हिस रोडच्या कामाला पुन्हा वेग आला आहे. पावसामुळे थांबलेले काम आता सुरू झाले असून, दुसऱ्या बाजूच्या सर्व्हिस रोडवर गटाराचे काम प्राधान्याने हाती घेण्यात आले आहे. मात्र, दोन्ही बाजूंचे सर्व्हिस रोड दर्जेदार आणि सुरक्षित पद्धतीने पूर्ण करून वाहतुकीसाठी पूर्णपणे खुले करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
गणेश कॉलनी परिसरात हॉटेल सुरभीकडून एमआयडीसीकडे जाणारा मार्ग तयार करण्यात येत आहे. हा मार्ग पूर्ण झाल्यानंतर स्थानिक नागरिकांना भुयारी मार्गातून एमआयडीसीमध्ये जाणे अधिक सोयीचे होणार आहे. सध्या या परिसरातील नागरिकांना एमआयडीसीमध्ये जाण्यासाठी जेकेमार्गे जावे लागत असल्याने होणारी गैरसोय कमी होण्याची अपेक्षा आहे.
या महामार्गासोबतच सर्व्हिस रोडवर अवजड वाहने, स्कूल बस आणि अन्य वाहनांची दिवसभर मोठी वर्दळ असते. त्यामुळे सर्व्हिस रोडचे काम योग्य नियोजनाने, आवश्यक सुरक्षितता राखून आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करणे गरजेचे आहे.
कामात त्रुटी आढळल्यास संबंधित विभागाने त्या तातडीने कंत्राटदाराच्या निदर्शनास आणून द्याव्यात. दोन्ही बाजूंचे अपूर्ण सर्व्हिस रोड उत्कृष्ट दर्जाच्या डांबरीकरणासह लवकरात लवकर पूर्ण करून वाहतुकीसाठी संपूर्ण खुले करावे, अशी मागणी वाहनचालक व गणेश कॉलनी परिसरातील नागरिकांनी केली आहे.




