
ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर यांचे निधन; मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा
वयाच्या ७३व्या वर्षी पुण्यात अखेरचा श्वास; अभिनयासह लावणीच्या क्षेत्रातील योगदान कायम स्मरणात
पुणे : मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री आणि प्रसिद्ध लावणी कलाकार मधू कांबीकर यांचे पुण्यात निधन झाले. त्या ७३ वर्षांच्या होत्या. आपल्या दमदार अभिनयाने आणि लावणीच्या खास शैलीने त्यांनी मराठी मनोरंजनविश्वात स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीत हळहळ व्यक्त होत आहे.
मधू कांबीकर यांनी अनेक मराठी चित्रपटांत आई, सासू यांसह विविध भूमिका साकारल्या. सहजसुंदर अभिनय, प्रभावी संवादफेक आणि लावणी सादरीकरणातील वैशिष्ट्यपूर्ण शैली यामुळे त्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या. ‘झपाटलेला’, ‘डेबू’, ‘बिनकामाचा नवरा’, ‘माझा छकुला’ आणि ‘एक होता विदूषक’ यांसारख्या चित्रपटांतील त्यांच्या भूमिका विशेष लक्षात राहिल्या.
२७ नोव्हेंबर २०१६ रोजी मुंबईतील माटुंगा येथील यशवंत नाट्यमंदिरात आयोजित ‘लावण्य संगीत’ कार्यक्रमादरम्यान त्यांना पक्षाघाताचा झटका आला होता. तब्बल १२ वर्षांनंतर त्या या कार्यक्रमातून पुन्हा लावणी सादर करत होत्या. प्रकृती अस्वस्थ असतानाही त्यांनी भैरवी सादर केली; मात्र त्यानंतर त्यांची प्रकृती खालावली. या घटनेचा त्यांच्या आरोग्यावर परिणाम झाला.
२०१८ मध्ये त्यांना झी चित्र गौरव पुरस्कार सोहळ्यात जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला होता. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना सोहळ्याला उपस्थित राहता आले नव्हते. त्यांच्या वतीने सुनेने हा पुरस्कार स्वीकारला होता.
अभिनय आणि लावणी या दोन्ही क्षेत्रांत आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविणाऱ्या मधू कांबीकर यांच्या निधनाने मराठी मनोरंजनविश्वातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे.




