
राजापुरात एटीएस, आयबीची धडक कारवाई एकाच कुटुंबातील तिघांची चौकशी; दिवसभर तपास यंत्रणांकडून गोपनीयता
राजापूर : दहशतवादविरोधी पथक (एटीएस), नवी मुंबई आणि भारतीय गुप्तचर विभागाच्या (आयबी) पथकाने सोमवारी सकाळी राजापूर शहरात धडक कारवाई केली. या कारवाईदरम्यान एकाच कुटुंबातील पती, पत्नी आणि मुलगी अशा तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. सकाळी साडेसातच्या सुमारास झालेल्या या कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली असून, या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर दिवसभर विविध चर्चांना उधाण आले होते. चौकशीनंतर सायंकाळी उशिरा या तिघांना सोडण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी एटीएस, नवी मुंबई आणि आयबीचे पथक राजापुरात दाखल झाले. या पथकात रत्नागिरी जिल्ह्यातील स्थानिक अधिकाऱ्यांचाही समावेश होता. स्थानिक पोलिसांच्या सहकार्याने संबंधित पथकाने शहरातील एका कुटुंबातील तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना राजापूर पोलीस ठाण्यात आणून चौकशी करण्यात आली.
संबंधित कुटुंबाचा एका आंतरराष्ट्रीय धार्मिक संघटनेशी संबंधित व्हॉट्सॲप समूहाशी संबंध असल्याच्या संशयातून ही कारवाई करण्यात आल्याची चर्चा आहे. मात्र, या चर्चेला कोणत्याही अधिकृत यंत्रणेकडून दुजोरा मिळालेला नाही. त्यामुळे या कारवाईमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
या कारवाईची माहिती मिळाल्यानंतर रत्नागिरीचे जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनीही राजापूर पोलीस ठाण्याला भेट दिली. दरम्यान, संबंधित तपास यंत्रणांकडून दिवसभर चौकशी सुरू होती. या संपूर्ण प्रकरणाबाबत एटीएस, आयबी तसेच स्थानिक पोलीस प्रशासनाने कोणतीही अधिकृत माहिती जाहीर केलेली नाही. त्यामुळे या कारवाईचे स्वरूप आणि त्यामागील कारण याबाबतची अनिश्चितता कायम आहे.
एटीएस आणि आयबीसारख्या तपास यंत्रणांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने केलेल्या या कारवाईमुळे राजापूर शहरासह तालुक्यात उत्सुकता निर्माण झाली आहे. मात्र, संबंधित तिघांना चौकशीसाठी बोलावण्यामागील नेमके कारण स्पष्ट झालेले नसल्याने या प्रकरणाबाबत विविध तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत.
अधिकृत माहितीकडे लक्ष
चौकशीनंतर संबंधित तिघांना सोडण्यात आल्याची माहिती समोर आली असली, तरी त्यांच्याविरोधात कोणती कारवाई करण्यात आली आहे किंवा चौकशीतून काय निष्पन्न झाले, याबाबत अधिकृत माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे तपास यंत्रणांकडून अधिकृत माहिती समोर आल्यानंतरच या कारवाईचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.



