
लांज्यात दुचाकींची जोरदार धडक; ५४ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, तरुण गंभीर जखमी
मुंबई-गोवा महामार्गावरील कुवे पुरागाव येथील दुर्घटना; मागून धडक दिल्याने अपघात

लांजा : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर दुचाकींच्या अपघातांची मालिका सुरूच असून, लांजा तालुक्यातील कुवे पुरागाव येथे दोन दुचाकींची जोरदार धडक होऊन एका ५४ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत दुसऱ्या दुचाकीवरील २६ वर्षीय तरुण गंभीर जखमी झाला आहे. रविवारी (११ ऑक्टोबर) सायंकाळी सातच्या सुमारास हा अपघात घडला.
लांजा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोहर सिताराम गुरव (वय ५४, रा. वनगुळे, गुरववाडी, ता. लांजा) हे आपल्या मेस्ट्रो दुचाकीने (एमएच ०८ एसी १८८९) मुंबई-गोवा महामार्गावरून वनगुळेच्या दिशेने जात होते. कुवे पुरागाव येथे आले असता, पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या डीओ दुचाकीने (एमएच ०८ एएम ९२२७) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. प्रथमेश रमेश करंबळे (वय २६, रा. आगरवाडी, लांजा) हा डीओ दुचाकी चालवत होता.
या अपघातात दोन्ही दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले. मात्र, अपघातानंतर काही वेळातच मनोहर गुरव यांचा मृत्यू झाला. गंभीर जखमी झालेल्या प्रथमेश करंबळे याला पुढील उपचारांसाठी रत्नागिरी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या घटनेप्रकरणी सुहास सखाराम भोवड (वय ३४, रा. वनगुळे, खालचीवाडी, ता. लांजा) यांनी लांजा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रथमेश करंबळे याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १०६(१), १२५(अ), १२५(ब), २८१ तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या अपघाताचा पुढील तपास लांजा पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रेणी पोलीस उपनिरीक्षक संजय मारळकर करीत आहेत.




