‘ऑफ्रोह’च्या राज्याध्यक्षपदी डाॅ. दीपक केदार, तर महासचिव नरेंद्र निमजे

ऑफ्रोह च्या राज्य अधिवेशनादरम्यान व्यासपीठावर आ. प्रवीण तायडे ,शिक्षण सभापती प्रितीताई रेवणे सह ऑफ्रोह चे राज्य पदाधिकारी

रत्नागिरी : ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ह्युमन (ऑफ्रोह) महाराष्ट्र या संघटनेच्या अमरावती येथील राज्यव्यापी अधिवेशनात नवीन राज्य कार्यकारिणीची निवड करण्यात आली. राज्याध्यक्षपदी अमरावती येथील डाॅ. दीपक केदार यांची तर महासचिव पदी नागपूर नरेंद्र निमजे यांची निवड करण्यात आली.
‘ऑफ्रोह’च्या राज्य विषय नियामक मंडळ ची बैठक तसेच राज्यव्यापी अधिवेशन व सर्वसाधारण सभेचे उद्घाटन आमदार प्रवीण तायडे यांचे हस्ते झाले. प्रमुख अतिथी म्हणून अमरावती महानगरपालिकेच्या शिक्षण सभापती प्रीती रेवणे या होत्या. माजी राज्याध्यक्ष शिवानंद सहारकर हे सभेच्या अध्यक्षस्थानी होते, तर सध्याचे राज्याध्यक्ष राजेश सोनपरोते हे विषय नियामक मंडळ बैठक व सर्वसाधारण सभेचे अध्यक्ष होते.
‘ऑफ्रोह’ ही संघटना मागील सहा वर्षांपासून आदिवासींच्या सांविधानिक हक्कासाठी कार्यरत आहेत. आदिवासी विकास विभाग हा आदिवासींमधील काही जातींचे जात प्रमाणपत्र बेकायदेशीर पद्धतीने अवैध घोषित करते व या जातींना घटनेच्या सांविधानिक हक्कांपासून वंचित ठेवते. या अन्यायाविरोधात ‘ऑफ्रोह’ च्या लढाईत मी मदत करेल, असे विचार आमदार प्रवीण तायडे यांनी याप्रसंगी व्यक्त केले. ॲड. प्रीती रेवणे यांनी अन्यायग्रस्त आदिवासींच्या शैक्षणिक व न्यायिक हक्कांचे संरक्षण करण्यासाठी मदत करण्यासाठी आश्वासन दिले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवानंद सहारकर, प्रभारी राज्याध्यक्ष राजेश सोनपरोते यांनी मनोगत व्यक्त केले. नवीन राज्य कार्यकारिणीत राजाध्यक्ष महासचिव यांच्याबरोबर कार्याध्यक्षपदी सोलापूरचे सुधाकर सुसलादी, राज्य कोषाध्यक्षपदी अमरावतीचे मनिष पंचगाम, तसेच ऑफ्रोह महिला आघाडीच्या राज्याध्यक्षपदी मुंबई येथील प्रिया खापरे, महासचिवपदी वनिता नंदनवार (पुणे) व कार्याध्यक्षपदी भारती धुमाळ (सातारा), कोषाध्यक्षपदी पुष्पा कोळी (बुलढाणा) यांची निवड करण्यात आली. स्वागताध्यक्ष म्हणून महासचिव डाॅ. दीपक केदार यांनी सर्वांचे स्वागत करून आभार व्यक्त केले.
या कार्यक्रमासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील माजी जिल्हाध्यक्ष व माजी प्रसिद्धीप्रमुख गजेंद्र पौनीकर, कार्याध्यक्ष बापुराव रोडे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष उषा पारशे, सचिव स्वाती रोडे, सहसचिव प्रतिभा रोडे आदी प्रतिनिधी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button