
रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाचे २०२६ चे विविध पुरस्कार जाहीर
रत्नागिरी : रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाचे २०२६ सालचे विविध पुरस्कार संघाचे अध्यक्ष माधव हिर्लेकर यांनी जाहीर केले आहेत. या पुरस्कारांचे वितरण १३ डिसेंबर रोजी एका शानदार कार्यक्रमात केले जाणार आहे. रोख रक्कम, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, पुस्तक, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. कोणतेही अर्ज न मागवता हे पुरस्कार कार्याची माहिती मिळवून दिले जातात, हे या पुरस्कारांचे वैशिष्ट्य आहे.
राणी लक्ष्मीबाई गौरव पुरस्कार आर्ना पाटणे (खेड), धन्वंतरी पुरस्कार डॉ. संतोष बेडेकर (रत्नागिरी), आदर्श पौरोहित्य पुरस्कार श्रीकृष्ण काजरेकर (कुडाळ), आचार्य नारळकर आदर्श शिक्षक पुरस्कार सौ. माधुरी कुलकर्णी (रायपाटण), कीर्तनकार पुरस्कार ह. भ. प. मोहन बुवा कुबेर (नागपूर), उद्योगिनी पुरस्कार सौ. शुभदा पाध्ये (कुर्धे-मेर्वी), कृषी संजीवन पुरस्कार नितीन करकरे (संगमेश्वर) आणि उद्योजक पुरस्कार योगेंद्र प्रभाकर हळबे आणि आदित्य प्रदीप तांबे (कान्हे, चिपळूण) यांना जाहीर करण्यात आला आहे.
खेड येथील ज्ञानदीप विद्यामंदिरची विद्यार्थिनी आर्ना रूपम पाटणे हिला राणी लक्ष्मीबाई पुरस्कार जाहीर झाला आहे. एका शैक्षणिक वर्षात तिची नेटबॉल (राष्ट्रीय) आणि बॉल बॅडमिंटन (राज्य) या खेळासाठी निवड झाली व तिने यात यश मिळवले आहे. या स्पर्धा धुळे, भंडारा, गोंदिया येथे झाल्या. यासाठी तिला क्रीडा शिक्षक संतोष भोसले यांचे मार्गदर्शन लाभले.
सौ. माधुरी रामचंद्र कुलकर्णी या जि. प. शाळा रायपाटण नं. ३ (ता. राजापूर) येथे शिक्षिका आहेत. यापूर्वी त्यांनी साटवली नं. १, कारवली नं. १, रायपाटण नं. १, नेवरे-ढोकमळे, पाचल नं. ५ या शाळांमध्ये काम केले आहेत. गणिताचे अध्यापन, शिष्यवृत्ती मार्गदर्शनामुळे त्यांचे विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी ठरले आहेत. परसबाग, विद्यार्थी भांडार, बागकाम, पाढे पाठांतर यासाठी त्यांनी योगदान दिले आहे.
सौ. शुभदा महेश पाध्ये (कुर्धे, मेर्वी) यांची उद्योगिनी पुरस्कारासाठी निवड झाली आहे. २००१ पासून त्यांनी नाटे येथे काजू प्रक्रिया उद्योगाला सुरवात केली व २००७ पासून कुर्धे येथे मशिनरी घेऊन काजूगर, फ्लेवरचे काजूगार व काजू बी प्रक्रिया करत आहेत. तसेच विविध फ्लेवर्सचे केळा वेफर्स, कोकण प्रॉडक्ट लोणची, सरबत बनवतात. रत्नागिरीतील विविध प्रदर्शनात त्या सहभाग घेतात व ऑनलाईन माध्यमातूनही प्रॉडक्टची मागणी येत असते.
धन्वंतरी पुरस्कार बालरोगतज्ज्ञ डॉ. संतोष वामन बेडेकर यांना जाहीर झाला आह. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज येथे त्यांनी एमबीबीएस आणि पदव्युत्तर एमडी- बालरोग शिक्षण पूर्ण केले. गेली ४० वर्षे रत्नागिरीत प्रॅक्टीस करत आहेत. असंख्य लहान मुलांच्या आजारपणातील वेदना कमी करुन त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवले आहे. वृत्तपत्रीय लेखन, आकाशवाणीवर मुलाखती, वैद्यकीय शिबिरे यातून त्यांनी समाजसेवा केली. आयएमए रत्नागिरी शाखेचे अध्यक्ष, रत्नागिरी जिल्हा बालरोगतज्ज्ञ संघटनेचे अध्यक्ष, लायन्स क्लब ऑफ रत्नागिरीचे पस्तीस वर्षे सक्रिय सदस्य, लायन्स चॅरीटेबल ट्रस्टचे सहा वर्षे अध्यक्ष, निरीक्षणगृह बालगृह संस्थेचे पंधरा वर्षे मानद सचिव, अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळाचे दोन वर्षे अध्यक्ष, परशुराम सेवा संघाचे कार्यकारिणी सदस्य, स्काय अॅंड अर्थ संस्थेचे कार्यकारिणी सदस्य म्हणून कार्यरत आहेत.
श्रीकृष्ण सीताराम काजरेकर (कुडाळ) यांनी आदर्श पौरोहित्य पुरस्कार जाहिर झाला. त्यांनी सातवीच्या शिष्यवृत्ती प्रथम क्रमांक मिळवला होता. त्यानंतर पुण्याला नवाथे गुरुजींकडे अष्टक संहिता, नंतर वे. मू. रामचंद्र टेंगशे (पैंगीण, गोवा) यांच्याकडे पुढील शिक्षण पूर्ण केले. विठ्ठल शास्त्री बोरकर यांच्याकडे ज्योतीष, याज्ञिक शिक्षण झाले. रांगोळी घालण्याचा छंद, नाटकात अभिनयही करत. याज्ञिकीच्या निमित्ताने २५ वर्षे गोव्यात होते. गेली २० वर्षे घोटगे गावी पौरोहित्य करत आहेत.
ह. भ. प. मोहन बुवा कुबेर (नागपूर) यांना आदर्श कीर्तनकार पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांचे शिक्षण एमए (संस्कृत) बी. एड., संगीत विशारद, हिंदी कोविद झाले आहे. नागपूर येथील धरमपेठ शिक्षण संस्थेमधून ते उपप्राचार्य म्हणून निवृत्त. झाले. वयाच्या ७ व्या वर्षापासून बाल कीर्तनकार इथपासून गेल्या ६० वर्षापासून कीर्तन सेवा करत आहेत. आजवर २४ हजाराहून अधिक कीर्तने केली आहेत. दासगणू, कवीश्वर, पटवर्धन, शिरवळकर आणि रामदासी पठडीची कीर्तने ते करतात. त्यांना कीर्तन श्री ही पदवी कांची पीठाधीशांकडून मिळाली. औदुंबर येथील यती महाराजांकडून कीर्तन केसरी आणि कीर्तन भूषण हा पुरस्कार शृंगेरी पिठाचे शंकराचार्य यांच्याकडून प्राप्त झाला. कवि कुलगुरू कालिदास विद्यापिठ संलग्न कीर्तन महाविद्यालयाचे संस्थापक सदस्य आणि पहिले उपप्राचार्य, अखिल भारतीय कीर्तन संमेलनाचे आयोजक सचिव, वैदर्भीय हरिकीर्तन संस्था नागपूरचे संस्थापक अध्यक्ष म्हणून काम केले आहे.
कृषी संजीवन पुरस्कार नितीन रविंद्रनाथ करकरे यांना जाहीर झाला आहे. १९८६ ते २००६ पर्यंत त्यांनी २० वर्षे टिव्ही इंडस्ट्रीत फ्री लान्स फील्म एडीटर म्हणून काम केले. विविध मालिका व जाहिराती, डॉक्युमेंटरी यांचे संकलन केले. २००४ साली मामाच्या गावाला जाऊया या संकल्पनेतून तुरळ या कोकणातील गावी शिबिरे सुरू केली. २०११ साली ठाणे सोडून गावी स्थायिक झाले. मातीतील कॉटेजेस बांधून होम स्टे सुरू आणि बंद पडलेली शेती सुरू केली. आता ३ प्रकारचे भात, हळद, आंबेहळद, कुळीथ, पावटे, कडवे, सर्व प्रकारच्या भाज्या, कलिंगड, आंबा, कोकम, फणस इत्यादी उत्पन्न घेतात. त्या उत्पादनातून लोणची, पीठं, पापड, मोरंबे, सरबतांचे उत्पादन ही होते. येणाऱ्या पर्यटकांना शेतातून ताटात संकल्पनेतून बहुतेक पदार्थ मिळतात.
उद्योजक पुरस्कार कान्हे, ता. चिपळूण येथील कोकोऑर्गेनिक कोकोनट इंडस्ट्रीजचे संस्थापक योगेंद्र प्रभाकर हळबे आणि आदित्य प्रदीप तांबे यांना जाहीर झाला. योगेंद्र हे बी. एसस्सी (इलेक्ट्रॉनिक्स) असून सर्टिफिकेट कोर्स इन क्वायर टेक्नॉलॉजी (सीसीआरआय, ॲलेप्पी) येथे केला आहे. तर आदित्य हे बी. एस्सी (बायोटेक्नॉलॉजी), एम. एस्सी (पर्यावरणशास्त्र) केले असून सॉलिड वॉटर वेस्ट मॅनेजमेंट, क्वायर टेक्नॉलॉजीचे (ॲलेप्पी) शिक्षण घेतले आहे. कोकोऑर्गेनिक इंडस्ट्रीजमध्ये २०२० पासून कोकोपीट व पायपुसणी आणि २०२४ पासून नारळाच्या करवंटीपासून विविध उपयुक्त, शोभिवंत वस्तू बनवल्या जात आहेत. कोकणात राहून एक नवा उद्योग यांनी सुरू केला असून त्यांना उद्योजक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.



