
अनधिकृत टपऱ्या व खोक्यांवर अखेर दापोली नगरपंचायतीने मंगळवारी थेट जेसीबी फिरविला.
दापोली – शहरातील मुख्य रस्त्यालगत वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेल्या अनधिकृत टपऱ्या व खोक्यांवर अखेर दापोली नगरपंचायतीने मंगळवारी थेट जेसीबी फिरविला. केळसकर नाका ते जालगाव पेट्रोल पंप तसेच केळसकर नाका ते दापोली एसटी स्थानक या प्रमुख मार्गांवरील अतिक्रमणांवर झालेल्या या कारवाईमुळे शहरातील रस्ते आणि पादचारी मार्ग मोकळे होण्यास सुरुवात झाली.नगरपंचायतीने कारवाईपूर्वी वारंवार नोटिसा देऊनही अतिक्रमणे न हटविणाऱ्या व्यावसायिकांवर अखेर प्रशासनाने कठोर भूमिका घेतली.
दापोली शहरातील मुख्य रस्त्यांच्या दुतर्फा अनेक ठिकाणी टपऱ्या, खोके व अन्य स्वरूपाची अनधिकृत बांधकामे उभी राहिली होती. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होण्याबरोबरच पादचाऱ्यांनाही रस्त्यावरून जीव मुठीत धरून चालावे लागत होते. या पार्श्वभूमीवर नगरपंचायतीने अतिक्रमणांविरोधात कारवाईचा निर्णय घेतला. ता. ०६ रोजी सकाळी नगरपंचायतीकडून ध्वनिक्षेपकाद्वारे उद्घोषणा करण्यात आली. न्यायालयाची स्थगिती नसलेल्या अतिक्रमणधारकांनी आपल्या टपऱ्या व खोके तसेच आतील साहित्य दुपारी दोन वाजेपर्यंत स्वतःच्या खर्चाने हटवावे, अन्यथा दुपारी अडीच वाजता नगरपंचायतीकडून कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला होता. त्यानंतर काही व्यावसायिकांनी स्वतःहून आपले साहित्य व आपले खोके हटविले. मात्र, काहींनी प्रशासनाच्या सूचनेकडे दुर्लक्ष केल्याने दुपारनंतर जेसीबीच्या सहाय्याने अतिक्रमणे हटविण्यास सुरुवात करण्यात आली. विशेष म्हणजे अनेक वर्ष रखडलेली एसटी स्टँडच्या बाजूस असलेल्या गल्लीतील खोके आज या कारवाई मध्ये हटवण्यात आली.




