३०८ चाकांचा ट्रक, २ कोटींचे डिझेल, सोबत १४ वाहनांचा ताफा अन् ४० कर्मचारी; इथेनॉलसाठी बेल्जियमहून आणलंय २०० टनांचं मशिन!

308 wheels, travel 12-12 km per day : उत्तर प्रदेशातल्या चंदौली जिल्ह्यात ३०८ चाकांच्या लांबलचक ट्रकची चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगली आहे. या ट्रकवरून २०० टन वजनाचं वेसल वाहून नेलं जात आहे. बेल्जियमहून समुद्रमार्गे भारतात आणलेलं हे वेसल ओडिशातल्या पारादीप बंदरातून उत्तर प्रदेशातल्या बलरामपूर इथल्या साखर कारखान्यात नेण्यात येत आहे. सध्या हा ट्रक चंदौलीत थांबवण्यात आलाय. पुढे जाण्यासाठी परवानगी आणि रस्ता मोकळा करण्यासाठी प्रतीक्षा केली जातेय.

बेल्जियममधील अँटवर्प बंदरातून समुद्रमार्गे ओडिशातील पारादीप बंदरात आणण्यात हे २०० टन वजनाचं वेसल आणलंय. त्यानंतर विशेष हायड्रोलिक ट्रेलरच्या मदतीने ते रस्तेमार्गे बलरामपूर साखर कारखान्याकडे नेण्यात येत आहे. साखर कारखान्यातल्या इथेनॉल प्लांटमध्ये वेसल बसवण्यात येणार आहे. त्यात व्हॅक्यूम बॉयलरसारखी जड औद्योगिक उपकरणे आहेत.

३०८ चाकं, दिवसाला १२-१२ किमी प्रवास

अवाढव्य वजन असलेलं हे वेसल वाहून नेण्यासाठी वापरण्यात येणारा ट्रक जवळपास १०० फूट लांब आणि ७ मीटर रूंद आहे. या ट्रकला ३०८ चाकं आहेत. वजन आणि लांबी यामुळे सामान्य रस्त्यांवरून ट्रक नेण्याचं आव्हान आहे. काही ठिकाणी रस्ता रूंद करावा लागतोय तर काही ठिकाणी वीजेचे खांब, स्ट्रीट लाइट, फूट ओव्हर ब्रीजही हटवावे लागत आहेत. विशेष म्हणजे हा ट्रक अत्यंत कमी वेगात धावत असून दिवसाला फक्त १० ते १२ किमी अंतर पार करतो. मार्गात अडथळा नसेल तर दिवसाला २० किमी प्रवास करतो.

आतापर्यंत 2 कोटींहून अधिक डिझेल खर्च

३०८ चाकांच्या या ट्रकला दर दिवशी २०० लीटरपर्यंत डिझेल लागतं. चालक सुरेश चंद्रा यांनी सांगितलं की, आतापर्यंत डिझेलसाठी २ कोटी रुपयांचा खर्च झालाय. शिवाय या ट्रकसोबत १४ वाहनांचा ताफाही असतो. त्यात जेसीबी, हायड्रा, क्रेन, ट्रेलर आणि टेक्निकल टीमच्या गाड्यांचा समावेश आहे. या महाकाय ट्रकसोबत 40 हून अधिक कर्मचारी आहेत.

मार्ग कसा?

पारादीप बंदरातून निघालेला हा ट्रक ओडिशानंतर झारखंड आणि बिहारमधून उत्तर प्रदेशात दाखल झाला. बिहारमधील विविध जिल्ह्यांतून प्रवास करत तो चंदौली आणि त्यानंतर वाराणसीपर्यंत पोहोचला आहे. पुढे गाजीपूर, आजमगड आणि उत्तर प्रदेशातील इतर भागांतून जात बलरामपूर साखर कारखान्यात तो पोहोचणार आहे.

भारतातच हे वेसल का बनवले नाही?

वेसल हे सामान्य टाकी किंवा बॉयलर नसून अत्याधुनिक औद्योगिक उपकरण आहे. उच्च दाब, उच्च तापमान आणि रसायनांचा सामना करण्यासाठी विशेष सामग्री आणि अचूक वेल्डिंग तंत्रज्ञानाची आवश्यकता असते. अशा उपकरणांचे उत्पादन युरोपमध्ये विशेष तंत्रज्ञानाच्या आधारे केले जाते. त्यामुळे हे वेसल बेल्जियममधून आयात करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button