
सावर्डे विद्यालयात ‘गणित पाढे पाठांतर स्पर्धे’ला उत्स्फूर्त प्रतिसाद
४०० विद्यार्थ्यांचा सहभाग; पाढ्यांच्या दुनियेत रमले विद्यार्थी
सावर्डे (प्रतिनिधी) : गणित विषयाची गोडी वाढविण्यासोबत विद्यार्थ्यांची गणितीय पायाभूत कौशल्ये भक्कम करण्याच्या उद्देशाने सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात ‘गणित पाढे पाठांतर स्पर्धे’चे आयोजन करण्यात आले. इयत्ता पाचवी ते सातवीतील तब्बल ४०० विद्यार्थ्यांनी स्पर्धेत उत्साहाने सहभाग घेतला.
विद्यार्थ्यांमधील गणिताची भीती दूर करून आवड, आत्मविश्वास आणि अचूक गणनकौशल्य वाढविण्यासाठी ही स्पर्धा घेण्यात आली. वर्गस्तरावरील प्राथमिक फेरीनंतर प्रत्येक वर्गातील उत्कृष्ट तीन विद्यार्थ्यांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली. अंतिम फेरी दोन गटांत घेण्यात आली. पहिल्या गटात २ ते ३०, तर दुसऱ्या गटात २ ते २० पर्यंतचे पाढे पाठ असलेल्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
मुख्याध्यापक राजेंद्रकुमार वारे यांच्या प्रेरणेने आयोजित या स्पर्धेला उपमुख्याध्यापक विजय चव्हाण आणि पर्यवेक्षक तथा गणित शिक्षक महेश कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रेरणा कदम, ज्योती निकम आणि स्फूर्ती जाधव यांनी परीक्षण केले. साजित चिकटे, अनंत डीके आणि गणेश बागवे यांनी नियोजन केले.
२ ते ३० पाढे गटात भावेश देवेंद्र चव्हाण प्रथम, गौरी विनेश वासकर द्वितीय, तर मिनसा अबू बकर तांबे आणि समर्थ योगेश सोनवणे यांनी तृतीय क्रमांक मिळविला. २ ते २० पाढे गटात दुर्वा सचिन चव्हाण प्रथम, प्रिन्स नागेश ओळींबे द्वितीय, तर शौर्य राकेश घाग आणि दैवत रवींद्र घाणेकर यांनी तृतीय क्रमांक मिळविला.
विजेत्या तसेच सहभागी विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद व पालकांनी अभिनंदन केले.




