
रत्नागिरी शहरात मोबाईल हॅक करून सीएची ५.६६ लाखांची ऑनलाइन फसवणूक
रत्नागिरी शहरातील तेली आळी येथील ज्यतिका अपार्टमेंटमध्ये कार्यालय असलेल्या चार्टर्ड अकाऊंटंटची तब्बल ५ लाख ६६ हजार ४४१ रुपये रकमेची ऑनलाइन फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. अज्ञात व्यक्तीने फिर्यादीच्या वडिलांचा मोबाईल हॅक करून त्याचा गैरवापर केल्याचा आरोप असून, कॅनरा बँकेचे डेबिट कार्ड मिळवून घेतल्यानंतर संयुक्त खात्यातून २ लाख रुपये परस्पर ट्रान्सफर करण्यात आले. तसेच मोबाईल बँकिंगच्या माध्यमातून ३ लाख ६६ हजार ४४१ रुपये क्रेडिट कार्ड बिल भरल्याचेही समोर आले आहे.
याप्रकरणी विपिन रसिकलाल शहा (५७, व्यवसाय-चार्टर्ड अकाऊटंट, रा. बन्सी बंगला, पार्क ओपल, शिवाजीनगर, रत्नागिरी) यांनी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, २६ सप्टेंबर रोजी रात्री ८.१४ ते ८.३७ वाजण्याच्या दरम्यान ही फसवणूक झाली. विपिन शहा हे तेली आळी येथील ज्यतिका अपार्टमेंटमधील त्यांच्या कार्यालयात असताना अज्ञात व्यक्तीने त्यांच्या वडिलांचा मोबाईल हॅक केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
मोबाईलचा गैरवापर करून अज्ञात व्यक्तीने कॅनरा बँकेचे डेबिट कार्ड इश्यू करून घेतले. त्यानंतर या कार्डाचा वापर करून शहा यांच्या कॅनरा बँकेतील संयुक्त खात्यातून २ लाख रुपये परस्पर ट्रान्सफर करण्यात आले.
यानंतर मोबाईल बँकिंगचा वापर करत ३ लाख ६६ हजार ४४१ रुपये इतक्या रकमेचे क्रेडिट कार्ड बिल भरण्यात आले. त्यामुळे एकूण ५ लाख ६६ हजार ४४१ रुपये रकमेची आर्थिक फसवणूक झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर २७ सप्टेंबर रोजी दुपारी २.१९ वाजता रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. आरोपी अद्याप अज्ञात असून मोबाईल हॅकिंग, डेबिट कार्डचा गैरवापर आणि ऑनलाइन व्यवहारांच्या माध्यमातून झालेल्या या फसवणुकीचा पोलीस तपास सुरू आहे.



