
“माता-भगिनींचा वापर करून फसवलं”, ललिता तारख यांचा जरांगेंवर आरोप; म्हणाल्या, “तुमच्या उपोषणाची मी साक्षीदार”
Manoj Jarange Patil Lalita Tarkh Allegations : मराठा आरक्षण आंदोलनात मनोज जरांगे पाटील यांना साथ देणाऱ्या ललिता तारख यांनी आता त्यांच्यावरच गंभीर आरोप केले आहेत. ललिता तारख यांनीच जरांगेंचं चौथ उपोषण सोडलं होतं.
“आंदोलनाच्या काळात आपण रात्रंदिवस काम केले, जरांगेंचे चौथे उपोषण सोडले; मात्र आंदोलनातून आपल्या गावाला कोणताही फायदा झाला नसल्याचा दावा तारख यांनी केला आहे. अंतरवाली सराटीमध्ये हैदराबाद गॅझेटनुसार अर्ज करून दहा महिने झाले, तरी त्याचा फायदा काय झाला, याचे उत्तर जरांगेंनी द्यावे”, अशी मागणी त्यांनी केली.
आम्ही आंदोलनात रांत्रदिवस झटलो
ललिता तारख म्हणाल्या, “२९ ऑगस्टला निवेदन देण्यासाठी मी जरांगेंसोबत गेले होते. त्यांचे चौथे उपोषणही मी सोडले. उपोषण सोडल्यानंतर आंदोलनात आम्ही रात्रंदिवस झटत होतो. चहापाणी, अन्नदान आणि पाण्याची व्यवस्था करत होतो. मात्र आंदोलनातून आम्हाला एकही फायदा झाला नाही. एकही प्रमाणपत्र मिळालेले नाही.”
“अंतरवली सराटीमध्ये हैदराबाद गॅझेटनुसार माझा पहिला अर्ज आहे. या अर्जाला दहा महिने झाले आहेत. त्याचा फायदा काय झाला, हे मनोज जरांगे यांनी मला सांगितले पाहिजे,” असेही त्या म्हणाल्या.
‘माता-माऊलींचा वापर करून फसवलं’
जरांगेंनी गावकऱ्यांना खोटी आश्वासने देऊन महिलांचा वापर केल्याचा आरोप तारख यांनी केला. “आम्हाला भावनिक केले. आम्ही तुम्हाला कधीच माफ करणार नाही. यापुढे अशी नाटकं बंद करा. उपोषण करूच नका,” अशी तीव्र टीकाही त्यांनी केली.
“तुम्ही कसे उपोषण केले, काय केले, दोन दिवस उपाशी राहिल्यावर माणसाची काय अवस्था होते. तुमच्या उपोषणाची मी साक्षीदार आहे. ज्यावेळी खरी वेळ येईल, त्यावेळी मी सर्व सांगेन”, असा इशाराही तारख यांनी दिला.
‘आमच्या गावासह १२३ गावांचा वापर’
“तुम्ही आमच्या गावाचा वापर करून घेतला, तसाच १२३ गावांचाही वापर करून घेतला. पंढरपूरमध्ये एक तरी कुणबी नोंद दाखवा; त्यानंतरच आमच्या गावात येऊन दाखवा”, असे आव्हान तारख यांनी दिले.
आरक्षणाच्या नावाखाली तीन-चार वर्षे आश्वासने देण्यात आली, मात्र प्रत्यक्षात त्यांच्या गावातील लोकांना आरक्षणाचा लाभ मिळाला नसल्याचे त्या म्हणाल्या. “आमच्या माता-भगिनी आंदोलनाच्या मंडपात झोपत होत्या. पोलीस अंतरवलीतील मंडप काढायला आले तेव्हा पन्नास बायका तिथे होत्या. आम्ही मंडपाला हात लावू दिला नाही. पण आज तुम्ही बोलला नाहीत. समाज तुम्हाला माफ करणार नाही”, अशी नाराजीही त्यांनी व्यक्त केली.




