रिंगणे येथे भरदुपारी घरफोडीचा प्रयत्न फसला; ग्रामस्थांनी दोघांना पकडले


सतर्क नागरिकांच्या तत्परतेमुळे चोरटे जेरबंद; घरफोडीसाठी वापरण्यात येणारी हत्यारेही हस्तगत


रत्नागिरी : रिंगणे-घळणकोंड परिसरातील एका बंद बंगल्यात भरदुपारी सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास घरफोडीचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, घरातील व्यक्तीच्या सतर्कतेमुळे तसेच ग्रामस्थांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे चोरीचा प्रयत्न फसला. घटनास्थळावरून पळून जाणाऱ्या दोघांना ग्रामस्थांनी पाठलाग करून पकडले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले.

बाबा आयरे यांच्या घरातील एका मुलाला संशयास्पद हालचाली लक्षात आल्याने त्याने सतर्कता दाखवली. महेश विश्वासराव यांनी तातडीने गणेश सुर्वे यांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर कुरंग येथील गणेश सुर्वे व त्यांच्या सहकाऱ्यांनी संशयितांचा पाठलाग सुरू केला.

झर्याच्या पुढे देसार परिसरात ग्रामस्थांनी त्यांची दुचाकी अडवून दोघांना पकडले. त्यांना रिंगणे येथे आणण्यात आले. या घटनेची माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरल्याने घटनास्थळी मोठी गर्दी जमली. त्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले.

संशयितांकडे दरवाजाचे लॉक तोडण्यासाठी वापरण्यात येणारी हत्यारे आढळून आली. पोलिस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर ग्रामस्थांनी दोन्ही संशयितांसह त्यांच्याकडील साहित्य पोलिसांच्या ताब्यात दिले. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

दरम्यान, घरातील मुलाने दाखवलेली सतर्कता आणि महेश विश्वासराव यांच्यासह गणेश सुर्वे व इतर ग्रामस्थांनी वेळीच केलेल्या प्रयत्नांमुळे संशयितांना पकडण्यात यश आले. या तत्परतेबद्दल ग्रामस्थांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button