
तिसंगी-कुळवंडी धोकादायक पुलाचा प्रश्न ऐरणीवर
नवीन पुलासाठी ग्रामस्थांचे गृहराज्यमंत्री योगेशदादा कदम, माजी मंत्री रामदासभाई कदम यांना साकडे
खेड : तालुक्यातील तिसंगी- खोपकरवाडी ते कुळवंडी गावांना जोडणाऱ्या डुबी नदीवरील धोकादायक व नादुरुस्त पुलाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या ठिकाणी नवीन पूल बांधण्यात यावा, अशी मागणी तिसंगी येथील ग्रामस्थांनी राज्याचे गृहराज्यमंत्री योगेशदादा कदम तसेच शिवसेना नेते व माजी मंत्री रामदासभाई कदम यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
तिसंगी आणि कुळवंडी गावांच्या मधून वाहणाऱ्या डुबी नदीवरील सध्याचा पूल अरुंद असून, त्याच्या दोन्ही बाजूंना संरक्षण कठडे अथवा पुरेशी साईडपट्टी नाही. त्यामुळे या पुलावरून ये-जा करणारे ग्रामस्थ तसेच शाळकरी विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून मार्गक्रमण करावे लागत आहे. हा पूल पंचक्रोशीतील ग्रामस्थांसाठी दळणवळणाचा महत्त्वाचा मार्ग असल्याने त्याची दुरवस्था चिंतेचा विषय बनली आहे.
पावसाळ्यात पुलाच्या मध्यभागी चिखल व माती साचल्याने रस्ता निसरडा होतो. पूल अरुंद असल्याने समोरून वाहन किंवा व्यक्ती आल्यास विद्यार्थ्यांना व पादचाऱ्यांना कडेकडेने मार्ग काढावा लागतो. अशावेळी तोल गेल्यास थेट नदीपात्रात पडण्याचा धोका असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
या पुलाची सार्वजनिक बांधकाम विभाग चिपळूण, उपविभाग खेड तसेच जिल्हा परिषद बांधकाम विभाग खेड यांनी प्रत्यक्ष पाहणी करून वस्तुस्थितीचा आढावा घ्यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची वाट न पाहता नवीन पुलाच्या बांधकामाला प्राधान्य देऊन त्यासाठी आवश्यक निधीची तरतूद करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.
गृहराज्यमंत्री योगेशदादा कदम आणि शिवसेना नेते, माजी मंत्री रामदासभाई कदम यांनी शासन दरबारी पाठपुरावा करून डुबी नदीवरील नवीन पुलाच्या प्रस्तावाला मंजुरी मिळवून द्यावी आणि पुलाच्या बांधकामाला तातडीने चालना द्यावी, असे साकडे ग्रामस्थांनी घातले आहे.




