जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी प्रशासन सज्ज; पंचनामे थेट बांधावर जाऊन संवेदनशिलतेने करा उर्वरित तालुक्यांचाही दुष्काळात समावेश करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार : पालकमंत्री डॉ. उदय सामंत जिल्हा पीक परिस्थिती आढावा बैठकीत निर्देश


रत्नागिरी, दि. २६ ) : जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी स्थितीच्या पार्श्वभूमीवर शेती, पिण्याचे पाणी आणि उद्योग यांच्या नियोजनात कोणतीही त्रुटी राहू नये. पंचनामे करताना अधिकारी-कर्मचाऱ्यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन अत्यंत संवेदनशीलतेने काम करावे, असे स्पष्ट निर्देश उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी आज येथे दिले. दुष्काळ जाहीर झालेल्या तालुक्यांसह जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये पिकांचे पंचनामे तात्काळ युद्धपातळीवर सुरू करण्याचे आदेशही त्यांनी प्रशासनाला दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा पीक परिस्थिती आढावा बैठकीत पालकमंत्री डॉ. सामंत बोलत होते. बैठकीस आमदार किरण सामंत, जिल्हाधिकारी मनुज जिंदल, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, अप्पर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे, निवडणूक उपजिल्हाधिकारी राहुल गायकवाड, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले, जिल्हा नियोजन अधिकारी निवास यादव यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
उर्वरित तालुक्यांचाही दुष्काळात समावेश करणार
मदत व पुनर्वसन विभागाच्या शासन निर्णयानुसार जिल्ह्यातील तीन तालुक्यांत दुष्काळ जाहीर झाला आहे. मात्र, उर्वरित तालुक्यांतही तशीच परिस्थिती असल्याने त्यांचाही समावेश दुष्काळ यादीत करण्याबाबत शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल, असे सांगून पालकमंत्री म्हणाले, जिल्हा प्रशासनाने उर्वरित तालुक्यांचे परिपूर्ण प्रस्ताव तातडीने शासनाकडे सादर करावेत. पाऊस लांबल्यास शेती, पिण्याचे पाणी आणि उद्योग क्षेत्रासाठी काटेकोर पाणी नियोजन आराखडा तयार ठेवावा.
थेट बांधावर जाऊन पंचनामे; ॲग्रीस्टॅक नोंदणीला गती द्या
जिल्हाधिकारी व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी पंचनाम्यांच्या कामकाजाचे प्रत्यक्ष पर्यवेक्षण करावे, अशा सूचना देऊन पालकमंत्री म्हणाले, पंचनामे करताना संबंधित शेतकऱ्याचे बँक खाते व आधार तपशील अचूक तपासून ई-केवायसी पूर्ण करावी. प्रत्येक पात्र शेतकऱ्याची नोंदणी ‘ॲग्री स्टॅक’मध्ये होईल याची दक्षता तलाठी व ग्रामसेवकांनी घ्यावी; यासाठी प्रांताधिकारी व गटविकास अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करावे.
यावेळी आमदार किरण सामंत यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याची दखल घेत, नोकरी-व्यवसायानिमित्त स्थलांतरित झालेल्या शेतकऱ्यांशी संपर्क साधून त्यांच्याही शेतीचे पंचनामे पूर्ण करावेत, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.
चारा नियोजन व वनराई बंधारे मोहीम
जिल्ह्यात मार्च २०२७ पर्यंत पुरेल इतका चारा उपलब्ध असल्याचे पशुसंवर्धन विभागाने स्पष्ट केले. यावर भात कापणीनंतर उपलब्ध होणारा पेंडा खरेदी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष निधीचा प्रस्ताव सादर करावा, जेणेकरून गरजू शेतकऱ्यांना चारा उपलब्ध करून देणे सुलभ होईल, असा तोडगा पालकमंत्र्यांनी सुचवला. जलसंधारणाचा आढावा घेताना जिल्ह्यात जलयुक्त शिवार अंतर्गत २३३ गावांत कामे सुरू असून मोठ्या २० धरणांत ८२ टक्के पाणीसाठा असल्याचे सांगण्यात आले. आगामी टंचाई लक्षात घेता जिल्हाभर ‘वनराई बंधारे’ बांधण्याची धडक मोहीम हाती घेण्याचे निर्देश देऊन पुढील आठवड्यात याचा आढावा घेण्याचे त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले. आंबा व काजू पिकांवर दुष्काळाचा होणारा परिणाम तपासून बागायतदारांना तातडीने दिलासा देण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.
शेतकऱ्यांना दिलासा : वीजबिल वसुलीला स्थगिती, कर्ज पुनर्गठन
शेतकऱ्यांच्या कृषी कर्जांचे प्रकार व व्याप्ती निश्चित करून अग्रणी बँकेने कर्ज पुनर्गठनाचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करावा. साडेसात अश्वशक्तीपर्यंतच्या कृषी पंपांचे वीजबिल आधीच माफ असून, उर्वरित पंपांच्या वीजबिल वसुलीस सद्यस्थितीत स्थगिती देण्यात यावी. महावितरणने थकबाकीदारांची यादी तहसीलदारांकडे सुपूर्द करावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.
याशिवाय, ग्रामीण भागात रोजगार हमी योजनेची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू करून अकुशल कामगारांच्या हाताला काम द्यावे, पिण्याच्या पाण्यासाठी टँकर मंजुरीचे निकष शिथिल करावेत, टँकर अधिग्रहणाचा मोबदला वेळेत देण्यासाठी तरतूद तपासावी आणि दुष्काळग्रस्त भागातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याबाबत जिल्हा प्रशासनाने शासनाकडे तात्काळ प्रस्ताव सादर करावा, असे निर्देशही पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी शेवटी दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button