
दिवाळीसाठी कोकण रेल्वे मार्गावर १२ विशेष ट्रेन
वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय; चिपळूण, रत्नागिरीसह कोकणातील स्थानकांना थांबे
चिपळूण : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे मार्गावर प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन १२ विशेष ट्रेन चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गणेशोत्सवाच्या काळात शेकडो जादा गाड्या सोडण्यात आल्यानंतर आता दिवाळीतही प्रवाशांसह पर्यटकांची संभाव्य गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने विशेष गाड्यांचे नियोजन केले आहे. त्यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
यामध्ये ट्रेन क्रमांक ०६०१३/०६०१४ तिरुवनंतपुरम सेंट्रल-मदार जंक्शन-तिरुवनंतपुरम सेंट्रल साप्ताहिक विशेष ट्रेन समाविष्ट आहे. ट्रेन क्रमांक ०६०१३ तिरुवनंतपुरम सेंट्रल-मदार जंक्शन साप्ताहिक विशेष गाडी तिरुवनंतपुरम सेंट्रल येथून दर बुधवारी २१ ऑक्टोबर, २८ ऑक्टोबर, ४ नोव्हेंबर, ११ नोव्हेंबर, १८ नोव्हेंबर आणि २५ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ७.४५ वाजता सुटणार आहे. ही गाडी तिसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजता मदार जंक्शन येथे पोहोचेल.
परतीची ट्रेन क्रमांक ०६०१४ मदार जंक्शन-तिरुवनंतपुरम सेंट्रल साप्ताहिक विशेष गाडी मदार जंक्शन येथून दर शनिवारी २४ ऑक्टोबर, ३१ ऑक्टोबर, ७ नोव्हेंबर, १४ नोव्हेंबर, २१ नोव्हेंबर आणि २८ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री ९.४० वाजता सुटणार आहे. ही गाडी चौथ्या दिवशी मध्यरात्री १२.४५ वाजता तिरुवनंतपुरम सेंट्रल येथे पोहोचेल.
कोकणातील प्रमुख स्थानकांवर थांबे
या विशेष गाडीला कोकण रेल्वे मार्गावरील मडगाव जंक्शन, थिवी, सावंतवाडी रोड, कणकवली, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा आणि पनवेल यांसह विविध स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत. त्यामुळे दिवाळीनिमित्त कोकणात येणाऱ्या तसेच कोकणातून परतीचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या विशेष गाड्यांचा लाभ घेता येणार आहे.
या गाडीला कोल्लम जंक्शन, कायनकुलम, मावेलीकारा, चेंगन्नूर, तिरुवल्ला, चांगनासेरी, कोट्टायम, एर्नाकुलम टाउन, अलुवा, त्रिसूर, शोरानूर जंक्शन, तिरूर, कोझिकोड, कन्नूर, कासरगोड, मंगळुरू जंक्शन, सुरथकल रोड, उडुपी रोड, कुंदापुरा, मोकंबिका रोड बायंदूर, मुर्डेश्वर, कुमठा, कारवार, मडगाव जंक्शन, थिवी, सावंतवाडी रोड, कणकवली, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा, पनवेल, वसई रोड, वापी, सुरत, वडोदरा जंक्शन, गोध्रा जंक्शन, मंडसोर, निमाच, चित्तौरगड, भिलवाडा, बिजाईनगर आणि अजमेर जंक्शन येथे थांबे असतील.
२० LHB डब्यांची रचना
विशेष ट्रेनमध्ये एकूण २० LHB डबे असतील. यामध्ये २-टियर एसीचा एक, ३-टियर एसीचे चार, ३-टियर एसी इकॉनॉमीचे १३ आणि दोन जनरेटर कारचा समावेश आहे.
विशेष ट्रेनचे थांबे आणि वेळापत्रक याबाबतची सविस्तर माहिती www.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. प्रवाशांनी प्रवासाचे नियोजन करण्यापूर्वी अधिकृत वेळापत्रक तपासावे, असे आवाहन करण्यात आले आहे.



