राजापूरात भटक्या कुत्र्यांसाठी कोंढेतड येथे शेल्टर हाऊस शहरात २५० ते ३०० भटके कुत्रे; नसबंदी, लसीकरणानंतरही उपद्रव कायम; प्रकल्पासाठी ५५ लाखांचा प्रस्तावित खर्च


राजापूर : राजापूर शहरात गेल्या काही वर्षांत भटक्या कुत्र्यांची संख्या वाढल्याने नागरिक, पादचारी तसेच वाहनचालक त्रस्त झाले आहेत. कुत्र्यांच्या झुंडीमुळे पाठलाग, चावा घेणे तसेच वाहनचालकांच्या अपघातांच्या घटना घडत असल्याने या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी राजापूर नगरपालिकेने पुढाकार घेतला आहे. भटक्या कुत्र्यांसाठी कोंढेतड येथे आवश्यक सुविधांनीयुक्त ‘शेल्टर हाऊस’ उभारण्याचा निर्णय पालिकेच्या सभेत घेण्यात आला आहे.
नगराध्यक्ष ॲड. हुस्नबानू खलिफे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी उपनगराध्यक्ष विनय गुरव यांच्यासह नगरसेवक आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
राजापूर शहरासह लगतच्या परिसरात भटक्या कुत्र्यांच्या झुंडी फिरताना दिसत असून, पादचारी, वाहनचालक आणि विशेषतः शाळकरी मुलांना त्यांचा त्रास सहन करावा लागत आहे. काही ठिकाणी कुत्र्यांनी नागरिकांचा पाठलाग केल्याच्या तसेच हल्ला करून जखमी केल्याच्या घटनाही घडल्या आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी सातत्याने होत होती.
नसबंदी, लसीकरणानंतरही समस्या कायम
पालिकेकडून यापूर्वी भटक्या कुत्र्यांची नसबंदी, निर्बीजीकरण आणि लसीकरणाची मोहीम राबविण्यात आली होती. एप्रिल २०२५ मध्ये राबविण्यात आलेल्या मोहिमेत सुमारे ६६ कुत्र्यांची नसबंदी आणि ८९ कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्यात आल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली. या मोहिमेमुळे काही प्रमाणात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव कमी झाला होता. मात्र, त्यानंतर पुन्हा शहरात कुत्र्यांची संख्या आणि उपद्रव वाढल्याचे निदर्शनास आले आहे.
शहरात २५० ते ३०० भटके कुत्रे
पालिकेच्या आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, सध्या राजापूर शहरात अंदाजे २५० ते ३०० भटके कुत्रे असल्याचे समोर आले आहे. वाढती संख्या लक्षात घेता केवळ नसबंदी व लसीकरणाच्या मोहिमांवर अवलंबून न राहता भटक्या तसेच जखमी कुत्र्यांसाठी निवारा आणि उपचाराची व्यवस्था निर्माण करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.
५५ लाखांचा प्रस्तावित खर्च
कोंढेतड येथे उभारण्यात येणाऱ्या शेल्टर हाऊसमध्ये बेवारस तसेच जखमी कुत्र्यांसाठी सुरक्षित निवारा, वैद्यकीय उपचार, अन्न-पाणी तसेच नसबंदी आणि लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. या प्रकल्पाचा आराखडा तयार करण्यात आला असून, त्यासाठी सुमारे ५५ लाख रुपयांचा प्रस्तावित खर्च अपेक्षित असल्याचे पालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रणात आणतानाच नागरिकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी शेल्टर हाऊसचा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळे या प्रकल्पासाठी निधीची उपलब्धता तसेच प्रत्यक्ष कामाला कधी सुरुवात होते, याकडे राजापूरवासीयांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button