
राजापूर नगरपरिषद कर्मचाऱ्यांना दिवाळीत १५ हजारांचा बोनस शहरासाठी आवश्यक वाहने खरेदीचा ठराव; कोदवली धरण परिसर प्रतिबंधित करण्याचा निर्णय
राजापूर : राजापूर नगरपरिषदेची कौन्सिल सभा गुरुवारी (दि. २४ सप्टेंबर) लोकनियुक्त नगराध्यक्षा ॲड. हुस्नबानू खलिफे यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. या सभेत शहरातील विविध विकासकामे, नागरिकांच्या समस्या तसेच नगरपरिषदेच्या कर्मचारी आणि प्रशासनाशी संबंधित विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांना यंदा दिवाळीनिमित्त १५ हजार रुपये बोनस देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.
राजापूर शहरातील विविध नागरी कामांसाठी आवश्यक असलेली वाहने उपलब्ध करून देण्याची मागणी नगरसेवक जमीर खलिफे यांनी मांडली. नगरपरिषदेकडे ट्रॅक्टर, डंपर आदी आवश्यक वाहने असणे गरजेचे असून त्यामुळे स्वच्छता व अन्य नागरी कामे करताना कर्मचाऱ्यांना सोयीचे होईल, असे त्यांनी सांगितले. त्यानुसार आवश्यक वाहनांची खरेदी करण्याचा ठराव सभेत मंजूर करण्यात आला.
कोदवली धरण परिसरात नागरिकांना प्रवेशबंदी
कोदवली धरण परिसरात काही नागरिक पोहण्यासाठी जात असल्याने भविष्यात दुर्घटना होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कोदवली धरण परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्याचा ठराव सभेत करण्यात आला. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे लवकरच पत्रव्यवहार करण्यात येणार आहे.
या विषयावर नगरसेवक जमीर खलिफे यांनी प्रशासनाने गांभीर्याने उपाययोजना करण्याची मागणी केली. धरण परिसर प्रतिबंधित केल्यानंतरही कोणी तेथे गेले आणि दुर्घटना घडली, तर त्याची जबाबदारी प्रशासनावर येऊ नये, यासाठी आवश्यक ती खबरदारी व सूचना फलक लावण्यात यावेत, अशी भूमिका त्यांनी मांडली. नगरसेवक राहुल तांबे यांनीही धरण परिसरात नागरिक पोहण्यासाठी जात असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने हा परिसर प्रतिबंधित करण्याची मागणी केली.
पाणीटंचाई टाळण्यासाठी बंधारे बांधण्याचा निर्णय
यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने आगामी काळात राजापूर शहराला पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शीळ जॅकवेल तसेच आंबेवाडी जॅकवेलजवळील वाहाळावर बंधारे बांधण्याचा ठराव सभेत करण्यात आला. पाणीसाठा टिकवून ठेवण्यासाठी तसेच उन्हाळ्यातील संभाव्य पाणीटंचाईवर उपाययोजना करण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला.
शहरातील रस्ते व पथदिव्यांच्या समस्येवर चर्चा
नगरसेवक दिलीप चव्हाण यांनी तालीमखाना ते जवाहर चौक या मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून ते तातडीने बुजविण्याची मागणी केली. गणेशोत्सवाच्या काळात तसेच आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची व वाहनांची मोठी वर्दळ लक्षात घेता रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी त्यांनी केली.
शहरातील काही भागांमध्ये बंद पडलेले सोलार हायमास्ट तातडीने दुरुस्त करून सुरू करण्यात यावेत, अशी मागणी नगरसेवक दिलीप अमरे यांनी केली. त्यामुळे रात्रीच्या वेळी नागरिकांची गैरसोय दूर होऊन परिसरातील प्रकाशव्यवस्था सुधारेल, असे त्यांनी सांगितले.
भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरणासाठी शेल्टर हाऊस
शहरातील भटक्या कुत्र्यांचा प्रश्नही सभेत उपस्थित करण्यात आला. कुत्र्यांच्या निर्बीजीकरणासाठी स्वतंत्र शेल्टर हाऊस उभारण्यात यावे, अशी मागणी काही नगरसेवकांनी केली. याबाबतही आवश्यक कार्यवाही करण्याचा ठराव करण्यात आला.
नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस, शहरासाठी आवश्यक वाहनांची खरेदी, कोदवली धरण परिसरातील सुरक्षितता, संभाव्य पाणीटंचाईवरील उपाययोजना, रस्त्यांची दुरुस्ती, सोलार हायमास्ट आणि भटक्या कुत्र्यांचा प्रश्न अशा विविध विषयांवर झालेल्या चर्चेमुळे कौन्सिल सभा महत्त्वपूर्ण ठरली.




