
गणेशोत्सव मंडळांना भास्करराव जाधव यांची भेट
पर्यावरणपूरक उपक्रम, सामाजिक संदेश आणि लोकसहभागाचे केले कौतुक
चिपळूण : गणेशोत्सवानिमित्त शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते तथा आमदार भास्करराव जाधव यांनी चिपळूण शहरातील विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना भेट देत गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी मंडळांच्या पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांशी संवाद साधत गणेशोत्सवाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रमांची माहिती घेतली.
या दौऱ्यात चिपळूण नगरपरिषद कर्मचारी वृंद सार्वजनिक पर्यावरणपूरक गणेशोत्सव, श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा अमृत महोत्सवी गणेशोत्सव, सार्वजनिक चिपळूणचा महाराजा गणेशोत्सव मंडळ, नवसाचा चिपळूणचा राजा गणेशोत्सव मंडळ, राहुल गार्डन गणेशोत्सव मित्र मंडळाचा ‘राहुल गार्डनचा राजा’, चिपळूण पोलीस कर्मचाऱ्यांचा ‘महापुरुष गणपती’ तसेच महावितरण गणेशोत्सव मंडळाला त्यांनी भेट दिली.
चिपळूण नगरपरिषदेच्या कर्मचारी वृंदाच्या पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला भेट दिली असता मुख्याधिकारी संजय जाधव, उपमुख्याधिकारी तथा गणेशोत्सव अध्यक्ष प्रमोद ठसाळे, मंगेश पेढांबकर, आरोग्य विभाग प्रमुख वैभव निवाते यांच्यासह कर्मचारी वर्गाने त्यांचे स्वागत केले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले.
श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या अमृत महोत्सवी गणेशोत्सवालाही त्यांनी भेट दिली. यावेळी माजी नगरसेवक तथा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचे चेअरमन मोहनशेठ मिरगल, सुनील कुलकर्णी, बाळा वेस्वीकर, रमण डांगे आदींनी स्वागत केले. मंडळाने जपलेल्या परंपरेचा आणि सामाजिक सहभागाचा त्यांनी आढावा घेतला.
‘सार्वजनिक चिपळूणचा महाराजा’ गणेशोत्सव मंडळाला भेट देताना बंधू कदम, सेक्रेटरी आकाश कदम, राहुल गुरव यांनी स्वागत केले. त्यानंतर ‘नवसाचा चिपळूणचा राजा’ गणेशोत्सव मंडळाला भेट देऊन गणरायाचे दर्शन घेतले. अध्यक्ष शैलेश टाकळे, समीर टाकळे, रत्नदीप देवळेकर, प्रशांत मुळये आणि नगरसेवक शशिकांत मोदी उपस्थित होते.
‘राहुल गार्डनचा राजा’ गणपतीचे दर्शन घेताना मंडळाचे अध्यक्ष आदित्य चौगुले, साजन कापडी आणि मिनेश कापडी यांनी स्वागत केले. चिपळूण पोलीस स्टेशनमधील पोलीस कर्मचाऱ्यांच्या ‘महापुरुष गणपती’चेही त्यांनी दर्शन घेतले. पोलीस उपविभागीय अधिकारी प्रकाश बेले, सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव, पोलीस उपनिरीक्षक निकम यांच्यासह पोलीस कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
महावितरण गणेशोत्सव मंडळालाही आमदार जाधव यांनी भेट दिली. उपाध्यक्ष तथा अतिरिक्त कार्यकारी अभियंता डोंगरे, पाटणकर, राऊत आदींनी त्यांचे स्वागत केले. यावेळी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी ‘प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजने’ची माहिती दिली.
दरम्यान, प्राध्यापक म्हणून ज्ञानदान आणि उपनगराध्यक्ष म्हणून लोकसेवा या दोन्ही जबाबदाऱ्या सांभाळणाऱ्या प्रा. रुपाली दांडेकर यांनी शिक्षण विषयात विद्यावाचस्पती (पीएच.डी.) पदवी संपादन केल्याबद्दल भास्करराव जाधव यांच्या हस्ते त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
गणेशोत्सव दौऱ्यात माजी उपनगराध्यक्ष प्रकाश (बापू) काणे यांच्या आदर्श हॉटेलला भेट देत पदाधिकाऱ्यांसोबत चहा-नाश्ता करण्यात आला. तसेच गायत्री स्वयंसहाय्यता महिला बचत गट, पागझरी यांच्या उकडीचे मोदक केंद्रालाही भेट देऊन महिला भगिनींशी संवाद साधला. यावेळी माजी जिल्हा प्रमुख सचिन कदम उपस्थित होते.
या दौऱ्यात उपशहर प्रमुख तथा नगरसेवक मिथिलेश (विकी) नरळकर, विभाग प्रमुख तथा नगरसेवक संजय गोताड, नगरसेवक फैसल कास्कर, नगरसेविका वैशाली कदम, जिल्हा सोशल मीडिया प्रमुख सचिन चोरगे, युवासेना शहर अधिकारी पार्थ जागुष्टे, युवती सेना तालुका अधिकारी तीर्था लाड यांच्यासह शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.
गणरायाचे दर्शन, गणेशोत्सव मंडळांशी संवाद, पर्यावरणपूरक उपक्रमांची दखल, महिला बचत गटाच्या उपक्रमाला भेट आणि प्रा. रुपाली दांडेकर यांच्या शैक्षणिक यशाचा सन्मान अशा विविध उपक्रमांमुळे भास्करराव जाधव यांचा गणेशोत्सव दौरा भक्ती आणि सामाजिक सहभागाने पार पडला.




