खवटीत हॉटेलमध्ये घुसून तरुणाला मारहाण; सहा-सात जणांविरुद्ध गुन्हा

बोलेरोच्या हेडलाईटचा प्रकाश डोळ्यावर पडल्याने विचारणा केल्याचा राग; प्लास्टिकच्या खुर्चीने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी

खेड : तालुक्यातील खवटी येथील सुरूची हॉटेलमध्ये घुसून तरुणाला हाताने तसेच प्लास्टिकच्या खुर्चीने मारहाण केल्याप्रकरणी सहा-सात अनोळखी इसमांसह एकाविरुद्ध खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना दि. १४ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री सुमारे ८.५० वाजता खवटी येथील मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या सुरूची हॉटेलमध्ये घडली.
याप्रकरणी अभय गौतम धोत्रे (वय २३, व्यवसाय हॉटेल कामकाज, रा. नातुनगर, घाचे फाटा प्रकल्प वसाहत, बौद्धवाडी, ता. खेड) यांनी फिर्याद दिली आहे. अमोल दळवी (पूर्ण नाव माहीत नाही, रा. पाखरवाडी, खवटी) तसेच त्याच्यासोबत असलेल्या सहा ते सात अनोळखी इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीनुसार, अभय धोत्रे व त्यांचा मित्र योगेश विटले हे बोरघर येथील चायनीज सेंटरसमोर गाडीवर बसले होते. त्यावेळी आरोपी बोलेरो वाहनातून तेथून जात असताना वाहनाच्या हेडलाईटचा प्रकाश फिर्यादी यांच्या डोळ्यावर पडला. याबाबत त्यांनी वाहनातील व्यक्तींना विचारणा केली. याचा राग मनात धरून आरोपींनी त्यांचा पाठलाग केला.
त्यानंतर खवटी येथील सुरूची हॉटेलजवळ आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या मित्राला गाठले. अमोल दळवी व त्याच्यासोबत असलेल्या सहा-सात जणांनी दोघांना हाताने तसेच प्लास्टिकच्या खुर्चीने मारहाण केली. या मारहाणीत दोघांना दुखापत झाली. तसेच फिर्यादी यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या प्रकरणी खेड पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३०९/२०२६ अन्वये भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ मधील कलम १८९(२), १९१(२), १९०, ११५(२), ३५२ व ३५१(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास खेड पोलिस करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button