
ढोल-ताशांच्या गजरात कर्ला-आंबेशेत गणेश आगमन मिरवणूक उत्साहात पार पडली
सुमारे १२० गणेशमूर्तींचा सहभाग; लेझिम, बॅण्ड आणि चक्रीभजनाने रंगला गणेशोत्सवाचा सोहळा
रत्नागिरी : ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’चा जयघोष, ढोल-ताशांचा कडकडाट, फुलांची उधळण आणि भक्तिमय वातावरण अशा उत्साहपूर्ण वातावरणात कर्ला-आंबेशेत येथील गणेश आगमन मिरवणूक सोमवारी दिमाखात पार पडली. यंदा या पारंपरिक मिरवणुकीचे ४०वे वर्ष असून, सुमारे १२० घरगुती गणेशमूर्ती या मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या.
कर्ला-आंबेशेत परिसरातील घरगुती गणरायांचे शहरातून गावाकडे वाजतगाजत आगमन करण्याची ही परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. पारंपरिक ढोल-ताशांच्या तालावर अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने निघणाऱ्या या मिरवणुकीला शहरातील विविध मोहल्ल्यांतून मिळणारा प्रतिसाद विशेष ठरतो.
यंदाच्या मिरवणुकीत ढोल-ताशा पथकांसोबत झांजपथक, कर्ला येथील गणराज मित्रमंडळाचे महिला लेझिम पथक, बेळगाव-बागलकोट येथील बॅण्डपथक तसेच शिवशक्ती चक्रीभजन सहभागी झाले होते. या पथकांनी आपल्या सादरीकरणातून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
सकाळी ९.३० वाजता श्रीफळ वाढवून मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष जयसिंग घोसाळे, शेखर घोसाळे, मुन्ना घोसाळे, किरण भाटकर यांच्यासह अनेक ज्येष्ठ नागरिक, महिला आणि बालकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. तब्बल चार ते पाच तास चाललेल्या या मिरवणुकीमुळे शहरात सर्वत्र गणेशोत्सवाचा उत्साह अनुभवायला मिळाला.
स्वातंत्र्यवीर सावरकर चौकातून सुरू झालेली मिरवणूक गोखले नाका, रामनाका, रत्नागिरी बस स्थानक, जयस्तंभ, शासकीय रुग्णालयमार्गे निवखोल येथून कर्ला आणि पुढे आंबेशेत येथे पोहोचली.
दरम्यान, गणेशभक्तांना शुभेच्छा देण्यासाठी आणि मिरवणुकीवर पुष्पवृष्टी करण्यासाठी श्री मंगलमूर्ती प्रतिष्ठानच्या सदस्यांनी उपस्थिती लावली.
मिरवणुकीदरम्यान वाहतूक व कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. अखेर दुपारी सुमारे ३ वाजता गणेश आगमन मिरवणूक कर्ला-आंबेशेत येथे दाखल झाली. पारंपरिक उत्साह, शिस्त आणि भक्तिभावाने पार पडलेल्या या मिरवणुकीने गणेशोत्सवाच्या आनंदात आणखी भर घातली.








