लोटेतील लक्ष्मी ऑरगॅनिकमधील पी-फास विरोधातील सह्यांच्या मोहिमेत अभिनेता ओंकार भोजने यांचा सहभाग


रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीमध्ये पी-फास (PFAS) या घातक रसायनाचे उत्पादन होऊ नये, यासाठी कोकण पर्यावरण संघर्ष समितीच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या सह्यांच्या मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या मोहिमेच्या तिसऱ्या दिवशी ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ फेम अभिनेता ओंकार भोजने यांनी प्रत्यक्ष भेट देत मोहिमेला पाठिंबा दर्शविला.

चिपळूण शहरात सुरू असलेल्या सह्यांच्या मोहिमेच्या ठिकाणी भेट देत ओंकार भोजने यांनी समितीच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पी-फाससारख्या घातक रसायनामुळे पर्यावरण आणि मानवी आरोग्यावर होणाऱ्या संभाव्य दुष्परिणामांबाबत चिंता व्यक्त केली. “आमचे भवितव्य वाचवण्यासाठी तुमच्यासारखी ज्येष्ठ मंडळी आणि पर्यावरणप्रेमी नागरिक लढा देत आहेत, याचा अभिमान वाटतो,” असे सांगत त्यांनी मोहिमेत सही करून आपला सहभाग नोंदविला.

लोटे औद्योगिक वसाहतीतील लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीमध्ये प्रस्तावित असलेल्या पी-फास रसायन उत्पादनाला स्थानिक नागरिक, पर्यावरणप्रेमी आणि विविध सामाजिक संघटनांकडून तीव्र विरोध होत आहे. पी-फास हे रसायन दीर्घकाळ पर्यावरणात टिकून राहणारे असून मानवी आरोग्यासाठी घातक मानले जाते. त्यामुळे भविष्यात पाणी, हवा आणि माती प्रदूषित होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

कोकण पर्यावरण संघर्ष समितीच्या वतीने नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी आणि शासनापर्यंत लोकभावना पोहोचवण्यासाठी सह्यांची मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेला चिपळूणसह परिसरातील नागरिक, विद्यार्थी, व्यापारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

दरम्यान, पर्यावरण आणि नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने हा प्रकल्प तातडीने थांबवावा, अशी मागणी समितीकडून करण्यात येत असून, येत्या काळात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button