ज्ञानेश कुमार यांच्या विरोधातील अभिजीत दिपकेंच्या आंदोलनाला ठाकरेंचा पाठिंबा; २ ऑक्टोबर रोजी मुंबईत मोठ्या संख्येने उतरणार!

विरोधक देशव्यापी आंदोलनाबरोबरच ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात महाभियोग चालविण्याच्या तयारीत आहेत. तसेच कॉक्रोच जनता पक्षाचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी २ ऑक्टोबर पासून देशव्यापी आंदोलन करणार असल्याचे जाहीर केले आहे. या आंदोलनाला आता शिवसेनेचे (ठाकरे) नेते आदित्य ठाकरे यांनी पाठिंबा दिला असून मुंबईतही मोठ्या संख्येने बाहेर पडू असे आश्वासन दिले आहे.

“ज्ञानेश कुमार यांनी शनिवारपर्यंत राजीनामा दिला नाही तर कॉक्रोच जनता पार्टी २ ऑक्टोबर रोजी मुंबईतील मोठे आंदोलन सुरू करेल आणि हे आंदोलन देशभरात नेले जाईल. गांधी जयंतीच्या निमित्ताने आपण लोकशाही वाचविण्याची शपथ घेऊ”, अशी घोषणा अभिजीत दिपके यांनी शुक्रवारी (२५ सप्टेंबर) सकाळी केली होती. या आवाहनाला आता आदित्य ठाकरे यांनीही पाठिंबा दर्शवला आहे.

आदित्य ठाकरे काय म्हणाले?

अभिजीत दिपकेंच्या आवाहनानंतर शिवसेनेचे (ठाकरे) नेते आदित्य ठाकरे यांनी एक्सवरून आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. “जर ज्ञानेश कुमार गेले नाहीत तर २ ऑक्टोबर पासून मत चोरीच्या विरोधात मोठ्या संख्येने मुंबईकर एकत्र येतील”, असा इशारा आदित्य ठाकरे यांनी दिला

तत्पूर्वी आदित्य ठाकरे यांनी गुरुवारीही याबद्दल भाष्य केले होते. एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये ते म्हणाले होते, “मुख्य निवडणूक आयुक्तांची पद सोडण्याची वेळ आता निश्चित झाली आहे. ज्यांनी मते चोरली, निवडणुकीत छेडछाड केली आणि भारताची लोकशाही व संविधान संपविण्याचा प्रयत्न केला, त्यांच्यासमोर न झुकण्याचा निर्णय आता देशाने केला आहे. बदल लवकरच होणार आहे. देशाचे एक दशक वाया घालवण्यात जे जबाबदार आहेत, त्यांना न्याय व्यवस्थेसमोर आणले जाईल.”

सीजेपीकडून जंतर-मंतर २.० ची घोषणा

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी निवडणूक आयोगातील इतर दोन आयुक्त सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी यांचा विरोध डावलून अनेक निर्णय घेतले असल्याची तक्रार दोन्ही आयुक्तांनी कॅबिनेट सचिवांकडे केल्याचे वृत्त द इंडियन एक्सप्रेसने दिले होते. एसआयआर प्रक्रिया आणि नवमतदारांच्या नोंदणीसाठी फॉर्म ६ मध्ये करण्यात आलेल्या बदलाला दोन्ही आयुक्तांनी विरोध दर्शवला होता. मात्र तो डावलून मुख्य आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी आपला निर्णय रेटला होता.

द इंडियन एक्सप्रेसने हे वृत्त समोर आणल्यानंतर एसआयआर प्रक्रियेद्वारे १३ कोटी मतदार वगळण्यात आल्याची आकडेवारी समोर आली. यामुळे देशभरात निवडणूक आयोगाच्या कारभारावर टीका होऊ लागली. कॉक्रोच जनता पार्टीने पत्रकार परिषद घेऊन ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली. तसेच राजीनामा दिला नाही तर ‘जंतर मंतर २.०’ आंदोलनाचा इशारा दिला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button