
गोव्याच्या धर्तीवर रत्नागिरीला पर्यटनाचे नवे ‘डेस्टिनेशन’ बनवणार!
पर्यटनाला उद्योगाचा दर्जा; पुढील दोन वर्षांत पर्यटन विकास केंद्र उभारणार – पालकमंत्री उदय सामंत
रत्नागिरी : कोकणातील निसर्गसौंदर्य, समुद्रकिनारे, संस्कृती आणि स्थानिक खाद्यसंस्कृतीच्या बळावर रत्नागिरी जिल्हा आता गोव्याप्रमाणेच पर्यटकांचे आकर्षण ठरत आहे. जिल्ह्यातील पर्यटनाला आणखी चालना देण्यासाठी शासन कटिबद्ध असून, हॉटेल व्यवसाय आणि फळप्रक्रिया उद्योगाला उद्योगाचा दर्जा देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या माध्यमातून या क्षेत्रात अमूलाग्र बदल घडवून आणता येईल. तसेच पुढील दोन वर्षांत पर्यटकांना जिल्ह्यातील पर्यटनस्थळांची माहिती एकाच ठिकाणी मिळावी, यासाठी पर्यटन विकास केंद्र विकसित करण्यात येणार असल्याची घोषणा पालकमंत्री उदय सामंत यांनी केली.
जागतिक पर्यटन दिनानिमित्त हॉटेल विवा येथे रत्नागिरी पर्यटन सहकारी सेवा संस्था मर्यादित, समृद्ध मराठी चेंबर्स ऑफ कॉमर्स (मुंबई) आणि पर्यटन संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे, इन्फिगो आय केअरचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्रीधर ठाकूर, समृद्ध कोकणचे संस्थापक संजय यादवराव, भाजप जिल्हा उपाध्यक्ष डॉ. चंद्रशेखर निमकर, माजी नगराध्यक्ष बंड्या साळवी, पर्यटन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजू भाटलेकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
पर्यटनामुळे हॉटेल व्यवसायाला मोठी चालना
पालकमंत्री सामंत यांनी पर्यटनासाठी सातत्याने काम करणाऱ्या राजू भाटलेकर यांचे अभिनंदन केले. पर्यटन परिषद, कार्यशाळा आणि विविध उपक्रमांच्या माध्यमातून पर्यटन क्षेत्रातील घटकांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.
दिवाळी, ३१ डिसेंबर, शिमगा आणि गणेशोत्सवाच्या काळात रत्नागिरीतील हॉटेल्समध्ये ९० ते ९५ टक्क्यांपर्यंत बुकिंग होत असल्याचे सांगत, पर्यटन क्षेत्राचा विस्तार होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
रत्नागिरी विमानतळ पर्यटनाचे नवे प्रवेशद्वार
रत्नागिरी विमानतळाच्या विकासाबाबत बोलताना सामंत म्हणाले की, विमानतळ होणार का, याबाबत पूर्वी प्रश्न उपस्थित केले जात होते. मात्र, सुमारे १७० कोटी रुपये खर्च करून एअरस्ट्रिपची लांबी १४०० मीटरवरून २१०० मीटर आणि रुंदी ३० मीटरवरून ४५ मीटर करण्यात आली आहे. त्यामुळे ८२ आसनी एटीआर विमानांची वाहतूक शक्य होणार आहे.
उडाण योजनेअंतर्गत उभारण्यात आलेली रत्नागिरी विमानतळाची टर्मिनल इमारत कोकणी संस्कृतीचे दर्शन घडवणारी असल्याचेही त्यांनी सांगितले. टर्मिनलमध्ये कोकणातील उत्पादनांना बाजारपेठ मिळावी यासाठी सहा विशेष स्टॉल्स उभारण्यात आले असून, त्यातून पर्यटकांना कोकम सरबत, सोलकढी यांसह स्थानिक पदार्थ व उत्पादनांची ओळख होणार आहे.
जानेवारीपासून मुंबई, हैदराबाद विमानसेवेची घोषणा
रत्नागिरी विमानतळावरून जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून मुंबई आणि हैदराबादसाठी विमानसेवा सुरू होणार असल्याची घोषणा पालकमंत्री उदय सामंत यांनी केली. विमानसेवा सुरू झाल्यानंतर रत्नागिरीच्या पर्यटनाला आणखी वेग मिळण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
स्थानिक पातळीवर पर्यटनाला चालना देण्यासाठी नवीन खाद्यपदार्थ आणि नाविन्यपूर्ण प्रयोग होत असल्याचेही त्यांनी सांगितले. मैत्री ग्रुपने तयार केलेल्या कॉर्न-चीज समोसासारख्या स्थानिक प्रयोगांचाही त्यांनी उल्लेख केला.
‘पर्यटन मित्र’ पुरस्काराने मान्यवरांचा गौरव
कार्यक्रमात पर्यटन संस्थेचे अध्यक्ष राजू भाटलेकर यांच्या हस्ते पालकमंत्री उदय सामंत यांना ‘विशेष पर्यटन मित्र’ सन्मान प्रदान करण्यात आला.
यावेळी सुदेश शेट्ये, सतीश कदम, संजय वैशंपायन, अमृता करंदीकर, ययाती शिवलकर, गौरेश फाळके, गौरव जोशी, महेंद्र मयेकर, प्रसाद देवस्थळी, ओम पाडाळकर, राधेय पंडित, शहनाज काझी, मानसी यादवराव, आनंद तायशेटे आणि भरत मोरे यांना ‘पर्यटन मित्र’ पुरस्कार, प्रमाणपत्र, शाल व श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात सुधीर तथा भाई रिसबूड यांनी कोकण पर्यटन आणि रत्नागिरीतील पर्यटनवाढीसाठी राबविण्यात आलेल्या विविध प्रकल्पांची माहिती दिली. केवळ संकल्पना न मांडता त्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यावर पालकमंत्री सामंत यांचा भर असल्याचे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश आयरे यांनी केले.







