
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रभाकर मोरे यांच्या घरी गणरायाचे आगमन
पारंपरिक पद्धतीने डोक्यावरून बाप्पाची मूर्ती आणली; वहाळमध्ये पुढील पाच दिवस भक्तिमय वातावरण
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ तसेच ‘शालू झोका देगो मैना’ या गाण्यातून आपल्या अभिनयाची वेगळी छाप उमटविणारे अभिनेते प्रभाकर मोरे यांच्या चिपळूण तालुक्यातील वहाळ येथील निवासस्थानी गणरायाचे भक्तिमय वातावरणात आगमन झाले. पारंपरिक पद्धतीने गणपती बाप्पाची मूर्ती डोक्यावरून घरी आणत प्रभाकर मोरे यांनी गणरायाचे स्वागत केले.
गणपती बाप्पाची मूर्ती घरी आणल्यानंतर विधिवत पूजा-अर्चा करून प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. गणेशोत्सवासाठी प्रभाकर मोरे यांचे संपूर्ण कुटुंब आपल्या वहाळ या मूळ गावी दाखल झाले आहे.
पुढील पाच दिवस वहाळ येथील निवासस्थानी पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. या कालावधीत आरती, भजन तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गणरायाच्या आगमनामुळे मोरे यांच्या घरासह परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.



