दिवाळवाडी ग्रामस्थांच्या मागणीला अखेर यश!आमदार किरण (भैय्या) सामंत यांच्या पाठपुराव्याला यश; रस्त्याच्या दुरुस्तीची ई-निविदा प्रक्रिया सुरू


राजापूर : तालीक्यातील पाचल–दिवाळवाडी रस्त्याच्या दुरवस्थेमुळे अनेक वर्षांपासून त्रस्त असलेल्या ग्रामस्थांच्या मागणीला अखेर यश आले आहे. आमदार किरण (भैय्या) सामंत यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागामार्फत या रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाला मंजुरी मिळाली असून, त्यासाठी ई-निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्याची आशा निर्माण झाली आहे.
अर्जुना प्रकल्पाच्या कालव्याच्या कामासाठी या रस्त्याचा वापर होत असल्याने रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली होती. परिणामी दिवाळवाडी ग्रामस्थ, वाहनचालक आणि पादचाऱ्यांना ये-जा करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सुशांत वायकुळ, अनिकेत सक्रे, प्रतीक शेट्ये, प्रवीण शेट्ये आणि प्रभात शेट्ये यांनी पुढाकार घेत रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी करणारे निवेदन सादर केले होते. या पाठपुराव्यास पांगरी गावचे अमर जाधव यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.
ग्रामस्थांच्या मागणीची तत्काळ दखल घेत आमदार किरण (भैय्या) सामंत यांनी संबंधित विभागाला आवश्यक सूचना देऊन या कामासाठी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांमुळे संबंधित विभागाच्या विशेष आर्थिक तरतुदीतून रस्त्याच्या दुरुस्तीचा मार्ग मोकळा झाला. यासाठी जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता विवेक संजय सोनार आणि उपविभागीय अभियंता अमोल एकनाथ बनसोडे यांनीही विशेष लक्ष घालून आवश्यक कार्यवाही केली.
जलसंपदा विभागाच्या सन २०२६-२७ मधील ई-निविदा प्रक्रियेंतर्गत अर्जुना प्रकल्पाच्या डाव्या व उजव्या कालव्यालगतच्या नादुरुस्त रस्त्यांच्या दुरुस्तीच्या कामांचा समावेश करण्यात आला आहे. या दोन कामांसाठी अनुक्रमे २ कोटी ४८ लाख १७ हजार ८५१ रुपये आणि २ कोटी ४३ लाख ७७ हजार ९५० रुपये अशी अंदाजित किंमत निश्चित करण्यात आली आहे.
या रस्त्यांच्या कामांचा समावेश
या दुरुस्तीच्या कामांमध्ये पाचल परिसरातील पुढील रस्त्यांचा समावेश आहे.
१. पाचल-अनुस्कुरा मुख्य रस्ता ते दिवाळवाडी धरणाकडे जाणारा रस्ता – अंदाजे २.४ किलोमीटर.
२. मौजे पाचल अंतर्गत पाचल-कोंडवाडी मुख्य रस्ता ते पवारवाडीकडे (प्रभाकर पवार यांच्या घरापर्यंत) जाणारा रस्ता – अंदाजे ०.३६० किलोमीटर.
३. मौजे पाचल अंतर्गत पाचल-कोंडवाडी ते विठ्ठल मंदिर (बामणे यांच्या घराकडे) व अनुषंगिक रस्ता – अंदाजे ०.३५० किलोमीटर.
तरुण ग्रामस्थांनी घेतलेला पुढाकार, आमदार किरण सामंत यांची सकारात्मक भूमिका आणि संबंधित अधिकारी वर्गाने केलेल्या प्रयत्नांमुळे अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या रस्त्यांच्या प्रश्नाला अखेर मार्ग मिळाला आहे. निविदा प्रक्रिया सुरू झाल्याने ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
या कामासाठी प्रयत्न करणारे आमदार किरण (भैय्या) सामंत, जलसंपदा विभागाचे संबंधित अधिकारी तसेच सहकार्य करणाऱ्या सर्वांचे पाचल-दिवाळवाडी ग्रामस्थांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात येत आहेत. आता निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन प्रत्यक्ष कामाला लवकरात लवकर सुरुवात व्हावी आणि ग्रामस्थांचा प्रवास सुखकर व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button