
शासकीय टपाल व पार्सलसाठी भारतीय डाक विभागाच्या सेवांचा वापर करा: डाकघर अधीक्षकांचे आवाहन
रत्नागिरी, दि. ५ ): भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाने सर्व मंत्रालये, विभाग तसेच त्यांच्या अधिनस्त कार्यालये आणि स्वायत्त संस्थांना सर्व देशांतर्गत टपाल व पार्सलविषयक कामांसाठी भारतीय डाक विभागाच्या सेवांचा प्राधान्याने वापर करण्याचे निर्देश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांनी आपल्या टपाल व पार्सल वाहतुकीसाठी भारतीय डाकच्या सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन रत्नागिरी विभागाचे डाकघर अधीक्षक यांनी केले आहे.
भारतीय डाक विभाग हे केंद्र सरकारच्या अखत्यारीतील तब्बल १७२ वर्षांची गौरवशाली परंपरा लाभलेले अग्रगण्य खाते आहे. देशभरात सुमारे १ लाख ६५ हजार टपाल कार्यालयांचे अथांग व विश्वासार्ह जाळे या विभागाकडे असून, दुर्गम भागातही दळणवळण सेवा पुरवणारी ही एक अत्यंत खात्रीशीर संस्था म्हणून ओळखली जाते.
शासकीय कामकाजातील विश्वासार्हता, सुरक्षितता आणि व्यापक पोहोच लक्षात घेता, जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालये आणि त्यांच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील अधिनस्त कार्यालयांनी पत्रव्यवहार, कागदपत्रे व पार्सल पाठवण्यासाठी भारतीय डाक विभागाच्या विविध टपाल सेवांचा जास्तीत जास्त वापर करावा, असेही डाकघर अधीक्षक यांनी पत्रकान्वये स्पष्ट केले आहे.



