गणेशोत्सवासाठी मुंबईहून गावी आलेल्या ३१ वर्षीय तरुणाचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू


घरातील वीज जोडणीतील बिघाडामुळे दुर्घटना झाल्याचा प्राथमिक अंदाज;


संगमेश्वर : गणेशोत्सवासाठी मुंबईहून आपल्या गावी आलेल्या ३१ वर्षीय तरुणाचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना संगमेश्वर तालुक्यातील सायले-कानालवाडी येथे रविवारी (१३ सप्टेंबर) सकाळी घडली. स्वप्नील श्रीकांत कानाल असे मृत तरुणाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, स्वप्नील कानाल हे गणेशोत्सवानिमित्त मुंबईहून आपल्या गावी आले होते. रविवारी सकाळी साडेसातच्या सुमारास घरातील वीज जोडणीमध्ये झालेल्या बिघाडामुळे त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला. या दुर्घटनेत त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेचे प्राथमिक कारण घरातील विद्युत जोडणीतील बिघाड असल्याचे सांगितले जात आहे.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर घरात आनंदाचे वातावरण असतानाच स्वप्नील यांच्या आकस्मिक मृत्यूची घटना घडल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या निधनाची बातमी समजताच सायले परिसरात शोककळा पसरली.

स्वप्नील हे मितभाषी, हसतमुख आणि मनमिळाऊ स्वभावाचे होते. कुटुंबीयांसह वाडीतील नागरिकांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांच्या अचानक जाण्याने नातेवाईक, मित्रपरिवार आणि ग्रामस्थांमधून हळहळ व्यक्त होत आहे.

स्वप्नील यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुली असा परिवार आहे. त्यांच्या एका मुलीचे वय अवघे तीन वर्षे, तर दुसरी मुलगी केवळ सहा महिन्यांची आहे. ऐन गणेशोत्सवाच्या काळात कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचा झालेला आकस्मिक मृत्यू अत्यंत हृदयद्रावक ठरला असून, या घटनेने संपूर्ण परिसराचे मन हेलावून गेले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button