राज्यपालांकडून पर्यावरणपूरक गणेशमूर्तींचे वितरण

गणेश चतुर्थीच्या पूर्व दिवशी राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते आज लोकभवन येथे विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींना पर्यावरणपूरक गणेशमूर्तींचे वितरण करण्यात आले.

भारतीय संस्कृतीचा निसर्ग आणि पर्यावरणाशी नेहमीच अतूट संबंध राहिला आहे. मात्र, अलीकडच्या काळात निसर्गाशी असलेला हा पारंपरिक संबंध काही प्रमाणात कमी होत आहे. मात्र युवा पिढी आपल्या या शाश्वत सांस्कृतिक मूल्यांकडे पुन्हा वळत आहे ही समाधानाची बाब असल्याचे राज्यपालांनी आपल्या भाषणात सांगितले.

पुढील वर्षी अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचून शाळांमध्ये पर्यावरणपूरक गणेशमूर्तींचे वितरण करण्याचा आपला मानस असल्याचे राज्यपालांनी सांगितले. विद्यार्थ्यांमध्ये लहान वयापासूनच पर्यावरण संवर्धनाविषयी जागरूकता निर्माण करण्यास यामुळे मदत होईल, असे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र लोकभवनच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या पर्यावरणपूरक गणेशोत्सव, ‘टीबीमुक्त महाराष्ट्र’ आणि ‘नशामुक्त भारत अभियान’ यांसारख्या उपक्रमांना स्वयंसेवी संस्थांनी पुढे येऊन सहकार्य करावे, असे आवाहन राज्यपालांनी केले.

प्लास्टिकच्या वाढत्या वापरामुळे होणाऱ्या दुष्परिणामांविषयी देखील व्यापक जनजागृती करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. पर्यावरणाच्या ऱ्हासाचा परिणाम संपूर्ण समाजावर होत असला, तरी त्याचा सर्वाधिक फटका गरीब, कामगार आणि इतर वंचित व असुरक्षित घटकांना बसतो, असे राज्यपालांनी सांगितले.

पर्यावरणाचे संरक्षण ही केवळ पर्यावरणीय जबाबदारी नसून महत्त्वाची सामाजिक जबाबदारीही आहे, असे राज्यपालांनी अधोरेखित केले.

यावेळी राज्यपालांच्या हस्ते महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव राहुल रेखावार, ज्येष्ठ पत्रकार प्रफुल्ल मारपकवार, नवशक्तीचे संपादक प्रकाश सावंत, एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ. उज्ज्वला चक्रदेव, अभिनेत्री रशा टंडन, अभिनेत्री हिना खान, अभिनेते आशुतोष पत्की, वृक्ष गजाननचे अक्षय व्ही. कौथळे, डॉ. संकेत खारपुडे, मेघाश्रेय फाउंडेशनचे विश्वस्त, प्रयास फाउंडेशनचे प्रतिनिधी तसेच विविध गणेश मंडळांच्या प्रतिनिधींना पर्यावरण पूरक गणेशमूर्ती देण्यात आल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button