
आज मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज!
महामुंबई परिसरात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली असताना प्रत्यक्षात शनिवार रात्रीपासूनच पावसाचा जोर वाढला. हवामान विभागाने पावसाचा जोर वाढल्यानंतर रविवारी दुपारी १२.३० च्या सुमारास महामुंबई परिसराला ऑरेंज ॲलर्ट दिला.
मात्र, त्याआधीच सखल भागांत पाणी साचल्याने नागरिकांची त्रेधातिरपीट उडाल्याने हवामान विभागाविरोधात नाराजीचा सूर उमटला.
कुठे किती पावसाची नोंद?
मुंबईमध्येरविवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सांताक्रूझ येथे ७८.७ तर, कुलाबा येथे ४०.८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. डहाणू येथे ४५.२ मिलीमीटर पाऊस नोंदला गेला. शनिवारी रात्रीपासून सकाळी १०पर्यंत पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये पावसाचा जोर अधिक होता. मुंबई महापालिकेच्या आकडेवारीनुसार वांद्रे कुर्ला संकुल अग्निशमन दल केंद्र येथे १४७.६ मिलीमीटर, बोरिवली अग्निशमन दल केंद्र येथे १३८ मिलीमीटर, आर मध्य महापालिका कार्यालय येथे १३५ मिलीमीटर, एम पश्चिम महापालिका कार्यालय येथे १३५.६ मिलीमीटर, चेंबूर येथील कलेक्टर कॉलनी येथे १३२.८ मिलीमीटर, गोवंडी येथील शिवाजीनगर महापालिका शाळा येथे १२१.८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. शहरामध्ये एफ दक्षिण विभाग येथे १०६.२, जी उत्तर येथे १०३.८ मिलीमीटर पाऊस नोंदला गेला.
प्रादेशिक हवामान विभागाकडून काय सांगण्यात आलं?
सकाळी १० पर्यंत पावसाचा तडाखा बसून, सखल भागांमध्ये पाणी साचल्यानंतर दुपारी १२.३० च्या सुमारास प्रादेशिक हवामान विभागाने मुंबई तसेच ठाणे, पालघर येथे ऑरेंज ॲलर्ट जारी केला. हा इशारा सोमवार सकाळी ८.३० पर्यंत कायम असल्याचे प्रादेशिक हवामान विभागाकडून सांगण्यात आले. मुंबईमध्ये सकाळी ८.३० ते सायं. ५.३० या कालावधीत कुलाब्यात ३० मिलीमीटर तर सांताक्रूझ येथे ७९.७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
वातावरणात भक्तिरंगाची उधळण
लाडक्या गणरायाच्या स्वागतासाठी घरोघरी तयारीची लगबग सुरू असतानाच रविवारी मुंबई, महामुंबई परिसरातील आकाशात कृष्णमेघांनी गर्दी केली आणि विघ्नहर्त्याच्या स्वागतासाठी निसर्गानेच जणू मंगलाभिषेक सुरू केला. गणरायाच्या आगमनाला अवघे २४ तास उरले असताना बरसलेल्या या सुखसरींनी वातावरणात भक्तिरंगाची उधळण केल्याने गेल्या काही दिवसांपासून दाटलेली पाऊसचिंता थोड्या प्रमाणात का होईना दूर तर झालीच शिवाय गणरायाच्या स्वागताचा उत्साहसुद्धा द्विगुणित झाला.
पावसाने दिवसभर उसंत घेतली नाही
गणेशोत्सवाच्या आगमनासाठी अवघी मुंबई सज्ज होत असताना रविवारी पावसाने शहराला झोडपून काढले. पावसाने दिवसभर उसंत घेतली नाही. मात्र, त्याचा भक्तांच्या खरेदी उत्साहावर तसूभरही परिणाम जाणवला नाही. छत्र्या आणि रेनकोटच्या आडून मुंबईकरांनी बाजारपेठ गाठत गणेशोत्सवासाठीची शेवटच्या टप्प्यातील खरेदी उरकली. गणेशोत्सवाच्या आदल्या दिवशी बाजारपेठांमध्ये सकाळपासूनच खरेदीची लगबग दिसून आली. घरातील गणरायाच्या स्वागतासाठी लागणारे पूजेचे साहित्य, सजावटीच्या वस्तू, फुले, तोरणे, विद्युत रोषणाई, आरास करण्यासाठीच्या वस्तू यांची खरेदी करण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.




