
दापोलीत अल्पवयीन मुलींशी गैरवर्तनाचे दोन गुन्हे दाखल
अडीच महिन्यांत पॉक्सोअंतर्गत सहा प्रकरणे; बालिका-महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील दोन वेगवेगळ्या गावांमध्ये अल्पवयीन मुलींशी गैरवर्तन केल्याच्या तक्रारी दापोली पोलीस ठाण्यात दाखल झाल्या असून, या दोन्ही प्रकरणांत दोन संशयितांविरोधात पॉक्सो कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अडीच महिन्यांच्या कालावधीत पॉक्सोअंतर्गत सहा गुन्हे दाखल झाल्याने दापोलीतील बालिका, युवती आणि महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या प्रकरणात १६ वर्षे ११ महिने २५ दिवस वयाच्या अल्पवयीन मुलीशी संशयिताने ओळख निर्माण करून फेब्रुवारी २०२६ ते १८ ऑगस्ट २०२६ या कालावधीत तिच्या अल्पवयीन असल्याची माहिती असतानाही शारीरिक संबंध ठेवल्याची तक्रार पीडितेच्या नातेवाईकांनी ९ सप्टेंबर रोजी दापोली पोलीस ठाण्यात दाखल केली.
या तक्रारीवरून संशयित अदनान लियाकत कोळथरकर (४०) याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ६४(१), ६४(२) तसेच पॉक्सो कायद्यातील कलम ४, ६ आणि ८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक ज्योती चव्हाण करीत आहेत.
दुसऱ्या प्रकरणात ८ वर्षे ४ महिने वयाच्या अल्पवयीन मुलीशी १ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास तिच्या घरी कोणी नसताना गैरवर्तन केल्याची तक्रार नातेवाईकांनी पोलिसांत दिली. मुलगी घरी एकटी अभ्यास करीत असताना संशयित प्रमोद भिकू लोवरे याने तिच्याशी लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
या प्रकरणी प्रमोद भिकू लोवरे याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ७५(२) आणि पॉक्सो कायद्यातील कलम ८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पूजा हिरेमठ करीत आहेत.
दरम्यान, अल्पवयीन मुलींशी संबंधित अशा घटना वारंवार समोर येत असल्याने पालक आणि नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. अशा प्रकरणांचा तपास जलदगतीने पूर्ण करून दोषींवर कायद्यानुसार कठोर कारवाई व्हावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.




