
लंडनच्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये एकनाथ शिंदेंचं इंग्रजीत भाषण; शिवरायांचा जयघोष करून मराठीचेही गायले गोडवे!
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ब्रिटनच्या संसदेतील हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये ‘कॉमनवेल्थ पब्लिक लीडरशिप रिकग्निशन’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. आज त्यांनी जगभरातील विविध नेत्यांसमोर अस्खलित इंग्रजीत भाषण केलं.
यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, आई-बहीण, लाडकी बहीण योजना आणि महाराष्ट्र शासन तुमच्या दारी आदींचा उल्लेख केला. तसंच, मराठी भाषेचाही गौरव केला.
लंडनमध्ये सुरेश भटांची कविता सादर
जय महाराष्ट्र म्हणत एकनाथ शिंदे यांच्या त्यांच्या भाषणाला सुरुवात केली. त्यावेळी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जयची’ही घोषणा झाली. तसंच, ‘महाराष्ट्रातील १२ कोटी जनतेच्या वतीने मी नम्रपणे हा पुरस्कार स्वीकारतो. त्यांचे कठोर परिश्रम आणि स्वप्न मला सतत मार्गदर्शन करत असतात. माझी मराठी ही मातृभाषा असून मराठी जनता आणि महाराष्ट्राचं शासन यांच्यावतीने मी मनापासून आभार मानतो’, असं एकनाथ शिंदे म्हणाले. यावेळी त्यांनी प्रसिद्ध कवी सुरेश भट यांच्या ‘लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी’ ही कविताही सादर केली.
‘नरेंद्र मोदी हे भारताचे एक दूरदर्शी आणि गतिमान नेते आहेत. त्यांच्या नेतृत्वाला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली आहे. जगातील ३६ हून अधिक देशांनी त्यांना त्यांच्या सर्वोच्च राष्ट्रीय नागरी पुरस्काराने सन्मानित केले आहे. महाराष्ट्र हे भारताचे औद्योगिक आणि आर्थिक पॉवरहाऊस (ऊर्जास्थान) आहे. नरेंद्र मोदी यांच्या ‘विकसित भारत’ या संकल्पनेला पाठिंबा देण्याचा आम्हाला अभिमान आहे. महाराष्ट्र राज्य हे भारताचे पॉवरहाऊस आहे. आमचा भूप्रदेश आणि अर्थव्यवस्था जगातील अनेक देशांपेक्षा मोठी आहे. मुंबई आणि लंडन ही मजबूत राजधानीची शहरे आहेत’, असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी मुंबई आणि लंडनचं कौतुक केल.
यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील अतिमहत्त्वाकांक्षी असलेली लाडकी बहीण योजनेचाही उल्लेख केला. ही योजना चॅरिटी नसून महिलांच्या सबलीकरणासाठी सुरू करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. जागतिक स्तरावरील संस्थांकडून लाडकी बहीण योजनेची दखल घेतल्याचं उपमुख्यमंत्र्यांनी म्हटल. तसंच, शासन आपल्या दारी योजनेमुळेही लाखो लोकांचा फायदा झाला, केवळ रस्ते बांधणे म्हणजे विकास नाही, तर विकास लोकांपर्यंत पोहोचणं महत्वाचं असतं, असंही एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केलं.




