नागपुरातून स्वीडनला पोहोचले ‘पेप्टाइड’; प्रयोगशाळेत तपासले अन् धक्कादायक बाब उघड!

नागपूर : नागपुरातून थेट स्वीडनला विकले गेलेले ‘पेप्टाइड’ उत्पादन आणि त्यानंतर ग्राहकाला त्याच्या गुणवत्तेबाबत आलेला संशय… प्रयोगशाळेत नमुना तपासताच त्यात आवश्यक औषधी घटकच नसल्याचे आढळले. ग्राहकाच्या तक्रारीनंतर अन्न व औषध प्रशासनाने तपास सुरू केला आणि बनावट लेबल, प्रमाणपत्रापासून अप्रमाणित उत्पादनांपर्यंतचा प्रकार समोर आला. अखेर जरीपटका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.

नेमके प्रकरण काय?

स्वीडनमधील टॉमी ब्लॉमक्विस्ट यांनी नागपुरातील ‘स्कायलाइन्स इम्पेक्स’कडून ‘एमओटीएस-सी’सह संशोधनासाठीच्या ‘पेप्टाइड’च्या कुप्या खरेदी केल्या. गुणवत्तेबाबत संशय आल्याने ‘एमओटीएस-सी’चा नमुना आंतरराष्ट्रीय मानांकित प्रयोगशाळेत तपासण्यात आला. त्यात सक्रिय औषधी घटक आणि अपेक्षित शुद्धता आढळली नाही.

बनावटपणाचा संशय कसा बळावला?

उत्पादनावर अमेरिकेतील ‘पेप्टाइड सायन्सेस’ कंपनीचे नाव होते. मात्र, त्यावरील लेबल आणि विश्लेषण प्रमाणपत्र बनावट असल्याचे संबंधित कंपनीने सांगितल्याचा उल्लेख फिर्यादीत आहे. त्यानंतर ब्लॉमक्विस्ट यांनी २० जूनला अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार केली.

नागपुरातील तपासणीत काय सापडले?

केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेच्या निर्देशानुसार २५ जूनला ‘स्कायलाइन्स इम्पेक्स’ची तपासणी झाली. ‘एमओटीएस-सी’सह विविध नमुने घेण्यात आले. ‘सीजेसी आणि इपामोरेलिन’, ‘टेसामोरेलिन’, ‘सोमाट्रोपिन’, ‘एमओटीएस-सी’ आणि ‘ग्लो’च्या प्रत्येकी दहा कुप्या पंजाबमधील मनहीर सिंग यांच्याकडून खरेदी बिलाशिवाय घेतल्याचे निष्पन्न झाल्याचा दावा फिर्यादीत आहे. त्यासाठी ९० हजार रुपये बँक खात्यात जमा करण्यात आले होते.

हजारो कुप्यांचे आणखी काय गूढ?

तपासात इंजेक्शनसाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्याच्या ३० मिलिलिटरच्या ९ हजार, १० मिलिलिटरच्या ९८४ आणि अन्य १० मिलिलिटरच्या १९ कुप्या आढळल्या. त्यावर ‘केवळ निर्यातीसाठी’ असा उल्लेख होता. फिर्यादीनुसार, सीमाशुल्क तपासणी टाळण्यासाठी ९० हजार रुपये मूल्याचा माल अवघ्या २०० अमेरिकी डॉलरचा दाखवण्यात आला होता.

प्रयोगशाळेच्या तपासणीत काय निष्पन्न झाले?

इंजेक्शनसाठीच्या पाण्याचे नमुने मुंबईतील शासकीय प्रयोगशाळेत पाठवण्यात आले. त्यापैकी दोन नमुने गुणवत्ता निकषांवर अप्रमाणित ठरले. उत्पादनांवर नवी मुंबईतील ‘डॉ. ग्लेक्स फार्माकेम’चा पत्ता होता. मात्र, त्या पत्त्यावर अशी कंपनी अस्तित्वात नसल्याचे तपासात आढळल्याचा दावा फिर्यादीत आहे.

पोलिसांनी कोणावर गुन्हा दाखल केला?

याप्रकरणी यश सवेंद्र बेरी, मनहीर सिंग तसेच अज्ञात उत्पादक आणि इतर साथीदारांविरुद्ध जरीपटका पोलिसांनी ५ सप्टेंबरला गुन्हा दाखल केला.

‘पेप्टाइड’ म्हणजे नेमके काय?

‘पेप्टाइड’ हे एकच औषध नसून विविध पदार्थांचा गट आहे. या प्रकरणातील काही पदार्थांचा संबंध शारीरिक वाढीचे संप्रेरक, चयापचय, स्नायू आणि शरीरातील चरबीच्या प्रक्रियेशी आहे. काही पेप्टाइड औषधांचा उपचारांसाठी वापर होतो, तर काही पदार्थांचा संशोधनासाठी अभ्यास केला जातो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button