
भटक्या कुत्र्यांना वेळीच आळा घाला, अन्यथा रत्नागिरी नगर परिषदेवर गुन्हा दाखल करू – युवासेनेचे माजी जिल्हाप्रमुख प्रसाद सावंत यांचा इशारा

रत्नागिरी ): रत्नागिरी शहरात भटक्या कुत्र्यांचा हैदोस वाढला असून नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. फगरवठार पोलीस लाइन जवळ नुकताच एक भयानक प्रकार घडला. येथे खेळणाऱ्या एका छोट्या मुलावर कुत्र्यांच्या टोळीने जीवघेणा हल्ला केला या पार्श्वभूमीवर भटक्या कुत्र्यांना वेळीच आवर घाला अन्यथा तुमच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करू असा आक्रमक इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवासेनेचे माजी जिल्हाप्रमुख प्रसाद सावंत यांनी रत्नागिरी नगर परिषदेला दिला आहे.
शहरातील मारुती मंदिर, एसटी स्टँड परिसर, माळनाका, शहरातील शाळा-महाविद्यालय परिसरात भटक्या कुत्र्यांच्या टोळ्या फिरत असून शाळकरी मुले, ज्येष्ठ नागरिक आणि दुचाकीस्वारांवर हल्ले होत आहेत. गेल्या काही दिवसात अनेक जण जखमी झाले आहेत.
नगर परिषद केवळ कर वसुली करण्यात व्यस्त असून नागरिकांच्या मूलभूत सुरक्षेकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप सावंत यांनी केला. शहरातील पोलीस लाइन जवळ दोन दिवसांपूर्वी भयानक प्रकार घडला. तिथे खेळणाऱ्या छोट्या मुलावर 7-8 कुत्र्यांनी जीवघेणा हल्ला चडवत फरफटत झाडीत नेले. तेथील काही जागरूक नागरिकांच्या ही बाब लक्षात आली म्हणून त्या बालकाचा जीव वाचला अन्यथा ह्याची जबाबदारी कोणी घेतली असती? असा सवाल त्यांनी उपस्थीत केलाय.
प्रसाद सावंत म्हणाले, “भटक्या कुत्र्यांचे तात्काळ निर्बीजीकरण (ABC Program) करून बंदोबस्त करावा. निर्बीजीकरण यापूर्वी किती वर्षापूर्वी झाले होते ते जाहिर करा. म्हणजे तुमचे सर्व दावे फोल ठरतील. रत्नागिरी नगर परिषदेने येत्या काही दिवसात ठोस कारवाई केली नाही आणि एखाद्या नागरिकाच्या जीवाला धोका निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी मुख्याधिकारी आणि नगर परिषद प्रशासनाची राहील. आम्ही थेट पोलीस ठाण्यात नगर परिषदेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करू.”
भटक्या कुत्र्यांबरोबरच मोकाट गुरं ही सुद्धा डोकेदुखी ठरत आहे. त्याचाही बदोबस्त करुन नागरिकांना मोकळा श्वास घेवूद्या. नागरीक तुम्हाला टॅक्स देतायत मग तुम्ही त्यांच्या मूलभूत गरजा तर पूर्ण करा असेही ते शेवटी म्हणाले.




