
TATA ग्रुपच्या मोठ्या कंपनीत खळबळ! 4,000 कर्मचाऱ्यांना कामावरुन काढणार!
टाटा ग्रुप : TATA ग्रुपच्या मोठ्या कंपनीत खळबळ माजवणारी अपडेट समोर आली आहे. टाटा मोटर्सच्या मालकीची आलिशान वाहने बनवणारी कंपनी जॅग्वार लँड रोव्हर (JLR) कंपनीत मोठी कर्मचारी कपात होणार आहे.
वाढता खर्च, कमी मागणी आणि अमेरिकेने लावलेले आयात शुल्क यांसारख्या आव्हानांमुळे कंपनीला अनेक आर्थिक समस्यांचा सामना करावा लागत आहे. आर्थिक बचतीसाठी कंपनी थेट 4 हजार कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा आणणार आहे.
जॅग्वार लँड रोव्हर कंपनी पुढील दोन वर्षांत ब्रिटनमधील सुमारे 4,000 नोकऱ्या कमी करण्याच्या तयारीत आहे. टाटा समूहात मोठे फेरबदल होत आहेत. याचा थेट फटका कर्मचाऱ्यांना बसण्याची शक्यता आहे. जेएलआर लवकरच कर्मचारी कपातीच्या औपचारिक घोषणा करण्याची शक्यता आहे. यामुळे हजारो कर्मचचारी नोकरी गमावण्याच्या दहशतीत आहेत.
जॅग्वार लँड रोव्हर कंपनीची ही कर्मचारी कपात उत्पादन निर्मीती विभागात होणार आहे.जॅग्वार लँड रोव्हर कंपनी यूकेमधील हेलवूड, वेस्ट मिडलँड्स आणि मर्सीसाइड येथील आपल्या कारखान्यांमध्ये अंदाजे 34,000 लोकांना रोजगार देते. याव्यतिरिक्त, कंपनीची देशांतर्गत पुरवठा साखळी अंदाजे 1,20,000 रोजगारांना आधार देते. ऑटो सेक्टरमध्ये मोठ्या प्रमाणात नोकरी देणारी जॅग्वार लँड रोव्हर कंपनी आहे.
टाटा मोटर्सचे माजी वित्त प्रमुख पी. बी. बालाजी यांनी गेल्या वर्षी जेएलआरचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर ही प्रस्तावित कर्मचारी कपात करण्यात येत आहे . कंपनीचा नफा वाढवणे आणि खर्च कमी करणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे. अहवालानुसार, कामगिरीत घट झाल्यामुळे टाटा मोटर्सने जेएलआरच्या व्यवस्थापनावर दबाव वाढवला आहे.
जून 2026 मध्ये संपलेल्या तिमाहीत JLR चा महसूल जवळपास 10 टक्क्यांनी घटला, तर करपूर्व नफा दोन-तृतीयांशपेक्षा जास्त घटून 109 दशलक्ष पाउंड झाला. याव्यतिरिक्त, कंपनीने पुढील दोन वर्षांत सुमारे 1.7 अब्ज पाउंडची बचत करण्याचे आणि वार्षिक 3,00,000 वाहनांच्या विक्रीच्या पातळीवर नफा-तोटा समान पातळीवर आणण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
बदलत्या जागतिक बाजारपेठेच्या परिस्थितीशी जुळवून घेणे आवश्यक असून, त्यासाठी कंपनीची संघटनात्मक रचना सुलभ केली जाईल, कार्यक्षमता सुधारली जाईल आणि आपली क्षमता अधिक बळकट केली जाईल असे जेएलआर कंपनीने आपल्या अहवालात म्हटले आहे.
पगारदार आणि व्यवस्थापन स्तरावरील कर्मचाऱ्यांसाठी ऐच्छिक कपात कार्यक्रम सुरू करण्यात आला असून, याबाबतची पुढील माहिती कर्मचाऱ्यांना दिली जाईल असे कंपनीने सांगितले.
याव्यतिरिक्त, यूकेमधून अमेरिकेत आयात होणाऱ्या वाहनांवर लावलेल्या 10 टक्के शुल्काचा JLR वर परिणाम झाला आहे. कंपनीच्या जागतिक विक्रीमध्ये उत्तर अमेरिकेचा वाटा 29 टक्के आहे. JLR ची ही सर्वात मोठी बाजारपेठ आहे. तथापि, गेल्या वर्षी झालेल्या सायबर हल्ल्यामुळे या वाहन उत्पादक कंपनीचे कामकाज अनेक महिने विस्कळीत झाले होते.




