तुमची सहमती असो की नसो, काही परिस्थितींमध्ये सरकार जमीन जप्त करू शकते! भूसंपादनाचे नियम, कायदा समजून घ्या!

Property Ownership : देशातील औद्योगिक विकास, पायाभूत सुविधा आणि सार्वजनिक कल्याणकारी प्रकल्पांसाठी सरकारी भूसंपादन एक सामान्य प्रक्रिया आहे, जी अनेकदा चर्चा आणि वादाचा विषय बनते. सरकार एखाद्या नागरिकाच्या मालकीची खाजगी जमीन कशी संपादित करते, मालकाची संमती आवश्यक आहे का, आणि कायदेशीर प्रक्रिया काय आहे, असे प्रश्न निर्माण होतात.

आपल्या संविधान आणि भूसंपादन कायद्यानुसार सरकारला सार्वजनिक हितासाठी जमीन संपादित करण्याचा अधिकार आहे, पण काही प्रकरणांमध्ये सरकारला जमीन काबीज करण्याचा अधिकार नाही. भारत सरकार एखाद्याची जमीन कशी जप्त करू शकते आणि या संदर्भात सरकारचे नियम काय आहेत, खालीलप्रमाणे समजून घेऊया.

सरकार तुमची जमीन जप्त करू शकते का?

सरकारला तुमच्या मालकीची जमीन एखादा सरकारी प्रकल्पासाठी आवश्यक असेल आणि तुम्ही विकण्यास तयार नसाल तर, कोणताही सरकारी अधिकारी तुम्हाला विक्री करारावर सही करण्यास भाग पाडू शकत नाही. एका खटल्याची सुनावणी करताना अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने म्हटले आहे की, जमीनमालकाच्या संमतीशिवाय विक्री दस्तऐवजावर सही केली जाऊ शकत नाही.

बलरामपूर जिल्ह्यातील रस्ता रुंदीकरणासाठी प्रकरण जमीन संपादनाशी संबंधित होते. अधिकारी आपली जमीन निश्चित किमतीला विकण्यासाठी दबाव आणत असल्याचा काही जमीनमालकांनी आरोप केला. या खटल्याच्या सुनावणीत जमीनमालक स्वेच्छेने जमीन विकत असेल आणि दोन्ही पक्ष किमतीवर सहमत असतील, तरच विक्री कराराद्वारे जमिनीचे संपादन केले जाऊ शकते असा न्यायालयाने निकाल दिला. त्यामुळे सरकारने जमीन संपादनासाठी प्रस्थापित कायदेशीर प्रक्रियेचे पालन करणे अनिवार्य आहे.

जमिनीची ऐच्छिक विक्री आणि शासकीय संपादन या एकच प्रक्रिया नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. तसेच जमीनमालक जमीन विकण्यास इच्छुक असल्यास सरकार आणि मालक परस्पर संमतीने किंमत ठरवू शकतात आणि त्यानंतर विक्रीपत्र तयार केले जाऊ शकते.

सरकारने जमिनीवर ताबा मिळवण्याच्या तरतुदी काय

भारतातील भूसंपादन, पुनर्वसन आणि पुनर्स्थापना कायद्यातील योग्य भरपाई आणि पारदर्शकतेचा अधिकार, 2012 (LARR कायदा, 2013) अंतर्गत, संमतीशिवाय जमीन संपादित करण्याची शक्यता परिस्थितीवर अवलंबून असते.

सार्वजनिक कामासाठी : जमीन केवळ सरकारद्वारे सार्वजनिक कामासाठी – जसे की संरक्षण, रेल्वे, रस्ते, रुग्णालये इत्यादी – संपादित केली जात असल्यास बाधित कुटुंबांच्या संमतीची आवश्यकता नसते. पण, सामाजिक परिणाम मूल्यांकन – SIA – आणि पुरेशी भरपाई देणे अनिवार्य आहे.

खाजगी भागीदारी (पीपीपी) प्रकल्प : खाजगी कंपन्या किंवा PPP प्रकल्पांसाठी जमीन संपादित केली जात असेल, तर प्रकल्पाच्या प्रकारानुसार 70-80% बाधित कुटुंबांची संमती आवश्यक असेल आणि संमतीशिवाय जमिनीचे संपादन होऊ शकत नाही.

आणीबाणीची परिस्थिती : काही विशिष्ट प्रकरणांमध्ये, जसे की राष्ट्रीय सुरक्षा किंवा आणीबाणीच्या परिस्थितीत (उदा. नैसर्गिक आपत्तीसाठी तातडीच्या पायाभूत सुविधा), सरकार भूसंपादन, पुनर्वसन आणि पुनर्स्थापना कायदा, 2013 च्या कलम 40 अंतर्गत संमतीशिवाय जमीन संपादित किंवा ताब्यात घेऊ शकते. पण, केवळ मर्यादित आणि अपवादात्मक परिस्थितीतच जागेचे संपादन शक्य आहे, आणि नुकसान भरपाई व पुनर्वसनाचे नियम लागू राहतात.

जमीन संपादित करण्यासाठी किती नुकसान भरपाई मिळते?

देशातील भूसंपाद, पुनर्वसन आणि पुनर्स्थापना यांमधील योग्य नुकसान भरपाई आणि पारदर्शकतेचा LARR कायदा, 2013 यामध्ये ग्रामीण भागात मूळ नुकसान भरपाईच्या दुप्पट आणि शहरी भागात एकपट नुकसान भरपाईची तरतूद केली आहे. याव्यतिरिक्त पुनर्वसन, पर्यायी जमीन किंवा रोजगारासाठीही तरतुदी आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button