
सरकारी हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या सामान्यांच्या जीवाला सरकारच्या लेखी काहीच किंमत नाही का? रोहित पवार यांचा संतप्त सवाल?
अमरावती येथील स्त्री रुग्णालयाला मंगळवारी पहाटे लागलेल्या भीषण आगीत तीन नवजात बालकांचा गुदमरून मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे.
”अशा घटना घडल्या की सरकारकडून उपाययोजना करत असल्याचं भासवलं जातं पण पुढे काही होत नाही. सरकारच्या लेखी सामान्यांच्या जीवाला काहीच किंमत नाही का? असा संतप्त सवाल रोहित पवार यांनी केला आहे.
रोहित पवार यांनी ट्विटरवर पोस्ट शेअर करत अमरावतीतील घटनेवर संताप व्यक्त केला आहे. ”अमरावतीत जिल्हा रुग्णालयाला आग लागून तीन नवजात बाळांचा होरपळून झालेल्या मृत्यूची घटना अत्यंत दुर्दैवी, वेदनादायी आणि तेवढीच संतापजनक आहे. सरकारी हॉस्पिटलमधील सुरक्षेचा मुद्दा वारंवार पुढं येत असतानाही सरकार याकडं का दुर्लक्ष करत आहे? सरकारी हॉस्पिटलमध्ये उपचार घेणारे सामान्य कुटुंबातील माणसं असल्याने सरकारच्या लेखी त्यांच्या जीवाला काहीच किंमत नाही का? अशाच घटना यापूर्वी राज्यातील अनेक सरकारी रुग्णालयात घडल्या आहेत आणि त्यावेळी चौकशी आणि काहीतरी उपाययोजना करत असल्याचं सरकारकडून भासवलं गेलं पण नंतर पुढं काय झालं हे कधीही पुढं आलं नाही. सरकारने तातडीने राज्यातील सर्व सरकारी हॉस्पिटलच्या फायर सुरक्षेचं ऑडिट करुन आवश्यक त्या उपाययोजना तातडीने कराव्यात आणि या घटनेचीही सखोल चौकशी करावी. तसंच अमरावतीमध्ये ज्या कुटुंबातील बाळांचा मृत्यू झाला त्या कुटुंबांचं नुकसान कशानेच भरुन काढता येणार नाही, पण त्यांना जास्तीत जास्त मदत कशी देता येईल, याचाही विचार व्हावा”, असे रोहित पवार यांनी ट्विट केले आहे.
अमरावती येथील जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या नवीन इमारतीतील तिसऱ्या मजल्यावर असणाऱ्या नवजात शिशु अतिदक्षता विभागामध्ये (एनआयसीयू) सोमवारी पहाटे साडे तीनच्या सुमारास भीषण आग लागली. या दुर्घटनेमध्ये एनआयसीयूमध्ये उपचार घेत असणाऱ्या 3 नवजात बालकांचा गुदमरून मृत्यू झाला तसेच सहा बालकांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. व्हेंटिलेटरमध्ये झालेल्या स्फोटामुळे किंवा शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षीच हा विभाग सुरू करण्यात आला होता. त्यामुळे आग लागल्यानंतर रुग्णालयातील अग्निशमन यंत्रणा कार्यान्विय का झाली नाही असा सवाल उपस्थित केला जात आहे.




