
गणेशोत्सवाच्या तोंडावर मुंबई-गोवा महामार्ग धोकादायक; सावर्डेतील पुलावरील रस्ता खचला
खचलेल्या रस्त्यावर दोन वाहनांचे टायर फुटले; सुदैवाने मोठी दुर्घटना टळली
चिपळूण : गणेशोत्सवासाठी कोकणात चाकरमान्यांची मोठी गर्दी होण्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथील आरती स्वीट्ससमोरील पुलावर महामार्गाचा रस्ता मोठ्या प्रमाणात खचल्याने वाहनचालकांसाठी धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे.
पुलावरील रस्त्याचा काही भाग खचून मोठी पोकळी निर्माण झाली आहे. या धोकादायक ठिकाणाची माहिती स्थानिक नागरिक व वाहनचालकांनी संबंधित विभागाला वारंवार दिली आहे. मात्र, अद्याप कायमस्वरूपी दुरुस्ती न झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर नुकताच काँक्रिटचा पॅच टाकून दुरुस्ती करण्यात आली आहे. त्यामुळे सध्या मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरून एकेरी वाहतूक सुरू आहे. अशा परिस्थितीत खचलेल्या रस्त्यामुळे वाहनचालकांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे.
दरम्यान, काल रात्री खचलेल्या भागातून जात असताना दोन वाहनांचे टायर फुटल्याची घटना घडली. सुदैवाने या घटनेत मोठी दुर्घटना घडली नाही. मात्र, अवजड वाहने तसेच दुचाकीस्वारांसाठी हा रस्ता अत्यंत धोकादायक बनला असून रात्रीच्या वेळी धोका अधिक वाढत आहे.
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून रात्रीच या ठिकाणी बॅरिकेड्स लावून वाहनचालकांना सतर्क केले आहे. मात्र, बॅरिकेड्स ही तात्पुरती उपाययोजना असून रस्त्याची तातडीने कायमस्वरूपी दुरुस्ती करणे आवश्यक आहे.
गणेशोत्सवापूर्वी दुरुस्तीची मागणी
गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला असून मुंबई, पुणे आणि इतर शहरांतून मोठ्या संख्येने चाकरमानी कोकणात दाखल होणार आहेत. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. अशा वेळी सावर्डे पुलावरील खचलेला रस्ता मोठ्या अपघाताला कारणीभूत ठरू नये, यासाठी प्रशासनाने तातडीने दखल घेऊन कायमस्वरूपी दुरुस्ती करावी, अशी मागणी स्थानिक नागरिक व वाहनचालकांकडून होत आहे.
दुर्घटना घडण्याची वाट न पाहता प्रशासनाने तातडीने रस्ता सुरक्षित करावा, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहे.





