
मार्लेश्वर तीर्थक्षेत्री ड्रोनद्वारे शुटींग करण्यास बंदी, देवस्थानचा निर्णय
सहयाद्रीच्या कडेकपारीत वसलेल्या, लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या प्रसिध्द श्री मार्लेश्वर तीर्थक्षेत्र परिसराचे ड्रोन कॅमेर्याने शुटींग करू नये शुटींग केल्यास प्रशासनामार्फत कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे मार्लेश्वर देवस्थानच्यावतीने जाहीर करण्यात आले आहे. याबाबतचे फलकही तीर्थक्षेत्री लावण्यात आले आहेत. भाविकांनी देवस्थानला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
डोनचे विविध प्रकार आहेत. ड्रोन उडविण्यासाठी शासनाने काही नियम व अटी घालून दिल्या आहेत. याचे पालन होणे गरजेचे आहे. ड्रोनला उंची व दृष्टीची मर्यादा आहे. मार्लेश्वर देवस्थान हे निसर्गाच्या खुशीत वसलेले आहे. नयनरम्य परिसर भाविक व पर्यटकांना भुरळ घालतो. प्रत्येकजण हा परिसर कॅमेराबध्द करतो. काही पर्यटक ड्रोन कॅमेर्याने शुटींग करतात. शुटींग करताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून श्री मार्लेशवर देवस्थान ट्रस्ट सतर्क झाले आहे. सुरक्षितेच्या दृष्टीने देवस्थानच्यावतीने नेहमीचे पावले उचलली जातात. नुकत्याच झालेल्या बैठकीत ड्रोन कॅमेर्याने शुटींग न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.




