
एकाच झाडावर अनेकरंगी फुले! ‘गुलबक्षी’ वनस्पतीबद्दल या रंजक शास्त्रीय गोष्टी माहीत आहेत का?
Gulbakshi Plant features : आपल्या मोहक आणि विविधरंगी फुलांमुळे जगभर लोकप्रिय असलेली ‘गुलबक्षी’ (Mirabilis jalapa) ही वनस्पती घरगुती बागांची शोभा वाढवण्यासाठी एक उत्तम पर्याय मानली जाते. गुलबक्षी (Mirabilis jalapa) ही नायक्टॅजिनेसी (Nyctaginaceae) कुलातील एक बहुवर्षायू, कंदयुक्त आणि आकर्षक शोभेची वनस्पती आहे. आपल्या मोहक आणि विविधरंगी फुलांमुळे ती जगभर लोकप्रिय आहे.
अद्भूत आणि आश्चर्यकारक
इंग्रजीमध्ये तिला Marvel of Peru किंवा Four O’Clock Flower या नावांनी ओळखले जाते. Mirabilis हा लॅटिन शब्द असून त्याचा अर्थ ‘अद्भुत’ किंवा ‘आश्चर्यकारक’ असा होतो, तर jalapa हे नाव मेक्सिकोमधील व्हेराक्रूझ राज्यातील जालापा (Xalapa) या शहरावरून पडले आहे. ‘मार्व्हल ऑफ पेरू’ हे नाव प्रचलित असले, तरी या वनस्पतीचे मूळ निवासस्थान मेक्सिको तसेच मध्य आणि दक्षिण अमेरिका मानले जाते. सध्या भारतासह उष्ण आणि समशितोष्ण कटिबंधातील अनेक देशांमध्ये गुलबक्षीची शोभेची वनस्पती म्हणून मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. गुलबक्षीचे झुडपाची उंची साधारणतः ६० सेंटीमीटर ते १ मीटरपर्यंत असते. खोड हिरवे, मांसल, भरपूर शाखायुक्त आणि काहीसे ठिसूळ असते. पाने साधी, समोरासमोर येणारी, अंडाकृती ते लंबगोलाकार, टोकदार, गुळगुळीत आणि गर्द हिरव्या रंगाची असतात.
अनेक वर्षे टिकणारा कंद
जमिनीखाली मोठा, जाड, काळसर कंद विकसित होतो. हा कंद अन्नसाठ्याचे कार्य करतो. त्यामुळे प्रतिकूल हवामानात जमिनीवरील भाग जळून गेला तरी कंद जिवंत राहतो आणि अनुकूलित ऋतू सुरू होताच त्यापासून पुन्हा नवीन फुटवे निर्माण होतात. या वैशिष्ट्यामुळे ही वनस्पती अनेक वर्षे सहज टिकून राहते.
रात्री फुलतात, सकाळी कोमेजतात
गुलबक्षीचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे तिची फुले. ही फुले दुपारनंतर साधारण चार वाजल्यापासून उमलण्यास सुरुवात करतात आणि संपूर्ण रात्र खुललेली राहतात. सकाळच्या सूर्यप्रकाशात ती हळूहळू कोमेजतात. या वैशिष्ट्यामुळे इंग्रजीमध्ये तिला Four O’Clock Flower असे नाव मिळाले आहे. फुले देठाच्या टोकाला लहान गुच्छांमध्ये येतात. त्यांचा आकार नलिकाकृती असून टोकाला घंटेसारखा विस्तारलेला असतो.
एका झाडावर विविध रंगांची फुले
पांढरा, पिवळा, गुलाबी, लाल, किरमिजी, जांभळा, नारिंगी तसेच विविध रंगांच्या मिश्र छटा असलेली फुले या वनस्पतीवर दिसतात. विशेष म्हणजे एका झाडावर वेगवेगळ्या रंगांची फुले उमलू शकतात. काही वेळा एकाच फुलामध्ये दोन किंवा तीन रंगांचे सुंदर मिश्रणही आढळते. वनस्पतीशास्त्राच्या दृष्टीने हे वैशिष्ट्य जनुकीय विविधतेचे उत्कृष्ट उदाहरण मानले जाते.
नैसर्गिक परागीभवन
फुलांमधून संध्याकाळी मंद, गोड आणि आल्हाददायक सुगंध दरवळतो. हा सुगंध पतंग, मधमाशा आणि इतर परागीभवन करणाऱ्या कीटकांना आकर्षित करतो. विशेषतः रात्री सक्रिय असणारे पतंग या फुलांचे महत्त्वाचे परागीभवनकर्ते आहेत. फुलांच्या नलिकाकृती रचनेमुळे लांब सोंड असलेले कीटक सहजपणे मधुरस मिळवतात आणि त्याच वेळी परागकण एका फुलातून दुसऱ्या फुलात पोहोचवतात. त्यामुळे नैसर्गिक परागीभवनाची प्रक्रिया प्रभावीपणे पार पडते.
कंदविभाजनातूनही नवीन रोप
फुलांनंतर लहान, गोलाकार आणि सुरुवातीला हिरव्या रंगाची फळे तयार होतात. पक्व झाल्यावर ती काळ्या रंगाची, कठीण आणि सुरकुतलेली दिसतात. प्रत्येक फळात एकच बी असते. बियांद्वारे वनस्पतीचे पुनरुत्पादन सहज होते. तसेच जमिनीतील कंदांचे विभाजन करूनही नवीन रोपे तयार करता येतात. बियांपासून वाढलेल्या रोपांमध्ये फुलांच्या रंगांमध्ये मोठी विविधता दिसून येते, म्हणून बागकामात या वनस्पतीचे विशेष आकर्षण आहे.
पाण्याचा निचरा आवश्यक
गुलबक्षीची लागवड अत्यंत सोपी आहे. उत्तम निचऱ्याची, सेंद्रिय पदार्थांनी समृद्ध जमीन आणि भरपूर सूर्यप्रकाश या वनस्पतीस अनुकूल असतात. हलक्या सावलीतही ती वाढते; मात्र भरपूर सूर्यप्रकाशात अधिक जोमाने फुलते. नियमित पाणी दिल्यास झाड निरोगी राहते, परंतु पाणी साचल्यास कंद कुजण्याचा धोका असतो. त्यामुळे योग्य निचरा आवश्यक आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीला बियांची पेरणी किंवा कंदांची लागवड केल्यास काही आठवड्यांतच जोमदार वाढ सुरू होते आणि लवकरच झाड फुलांनी बहरते.
अँटिऑक्सिडंट गुणधर्म
शोभेव्यतिरिक्त गुलबक्षीला पारंपरिक औषधी महत्त्वही आहे. मध्य व दक्षिण अमेरिकेतील पारंपरिक औषधात तिच्या मुळांचा, पानांचा आणि फुलांचा उपयोग विविध आजारांवर केला जात असे. आधुनिक संशोधनांमध्ये या वनस्पतीमध्ये दाहशामक, जंतुनाशक, बुरशीनाशक आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्म असलेली काही जैवरासायनिक संयुगे आढळल्याचे नमूद करण्यात आले आहे. तथापि, औषध म्हणून तिचा वापर तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच करावा.
फुलांमध्ये नैसर्गिक रंगद्रव्य
गुलबक्षीच्या फुलांमधून नैसर्गिक रंगद्रव्यही मिळते. पूर्वी काही ठिकाणी या रंगांचा वापर मिठाई, पेये आणि हस्तकलेमध्ये केला जात असे. अजूनही काही भागांत लहान मुले फुलांचा रस नैसर्गिक रंग म्हणून वापरतात. त्यामुळे या वनस्पतीला सांस्कृतिक आणि शैक्षणिक महत्त्वही आहे. वनस्पतीशास्त्रातील संशोधनामध्ये गुलबक्षीचे विशेष स्थान आहे. विविध रंगांची फुले, एकाच झाडावर दिसणारी विविध रंगानी नटलेली फुले, संकरातून फुलात निर्माण होणारे नवीन रंग यामुळे जनुकीय गुणधर्मांचा अभ्यास करण्यासाठी या वनस्पतीचा मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जातो. तसेच जैविक घड्याळ (Biological Clock), फुलांच्या उमलण्याची वेळ आणि निशाचर परागीभवन यांसारख्या विषयांच्या अभ्यासातही ही वनस्पती महत्त्वाची मानली जाते.
कमी देखभाल, भरपूर फुलोरा
भारतात गुलबक्षी ही घरगुती बागा, शाळा, सार्वजनिक उद्याने आणि रस्त्यांच्या कडेला मोठ्या प्रमाणावर शोभेची वनस्पती म्हणून लावली जाते. कमी देखभाल, भरपूर फुलोरा, विविध रंगांची उधळण आणि वर्षानुवर्षे टिकून राहण्याची क्षमता यांमुळे ती बागकाम करणाऱ्यांची आवडती वनस्पती आहे. संध्याकाळच्या मंद प्रकाशात उमलणारी तिची रंगीबेरंगी फुले परिसराला एक वेगळेच सौंदर्य प्रदान करतात.
निसर्गाची अद्भुत कलाकृती
गुलबक्षीची आकर्षक फुले ही निसर्गाची एक अद्भुत कलाकृती आहे. फुलातील रंगांची विलक्षण विविधता, सोपी लागवड, पर्यावरणीय महत्त्व, परागीभवनातील भूमिका आणि वनस्पतीशास्त्रीय संशोधनातील उपयुक्तता यांमुळे या वनस्पतीला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.



