
शिक्षक दिनी शालेय कर्मचाऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा
रत्नागिरी : महाराष्ट्र राज्यातील १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त विनाअनुदानित, अंशत: अनुदानित व नंतर १०० टक्के अनुदान प्राप्त मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना जुनी पेन्शन लागू व्हावी यासाठी राज्यभर आंदोलन पुकारण्यात आले आहे. या आंदोलनादरम्यान रत्नागिरीत शनिवारी शिक्षक दिनी माळनाका ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मूक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये जिल्ह्यातील अनेक शालेय कर्मचारी सहभागी झाले होते.
राज्यात गेल्या बारा वर्षांपासून खासगी अनुदानित शाळांचा शिक्षकांचा जुन्या पेन्शनचा प्रश्न मार्गी लागलेला नाही. काही शिक्षकांची भविष्य निर्वाह खाती चालू आहेत, तर काही शिक्षकांची भविष्य निर्वाह खाती बंद करण्यात आली आहेत. प्रत्येक विभागातील उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असता तीन खंड पिठानी जुनी पेन्शन देण्याचा निर्णय दिला आहे. तरीही शासन पातळीवर अजूनही ठोस निर्णय घेतला जात नाही. सर्वोच्च न्यायालयात या संदर्भात गेले सात वर्षे केस चालू असून तिथे सकारात्मक प्रतिज्ञापत्र देण्याचे शासनाने मान्य करूनही अजूनही कोणतीच कार्यवाही करण्यात आलेली नाही.
या विरोधात निषेध नोंदविण्यासाठी संपूर्ण राज्यात १ सप्टेंबर ते ४ सप्टेंबरपर्यंत काळी फित लावून कामकाज करण्यात आले होते. आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्यात मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले. ५ सप्टेंबर शिक्षकदिन असल्याने या दिवशी रत्नागिरी शहरातील माळनाका ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मूक मोर्चा काढण्यात आला. मोर्च्यात सहभागी झालेल्यांनी तोंडाला काळा मास्क लावला होता.
यावेळी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांना जुनी पेन्शन संदर्भात मागण्यांचे निवेदन देण्यात आले. तसेच आंदोलनादरम्यान सेवानिवृत्त शिक्षक इच्छा मरणाची मागणी देखील करण्यात आली. शासनाने २५ सप्टेंबरपर्यंत जुनी पेन्शन संदर्भात योग्य निर्णय न घेतल्यास २८ सप्टेंबरपासून आझाद मैदान मुंबई येथे राज्यस्तरीय आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.




