
सणासुदीच्या तोंडावर चिपळूण बस स्थानकासमोरील रस्त्याची खोदाई; नागरिकांमधून संताप
प्रशासनाची परवानगी नसताना महानगर गॅस कंपनीचे काम सुरू
चिपळूण : दहीहंडी आणि गणेशोत्सवासारखे मोठे सण तोंडावर आले असताना मध्यवर्ती बसस्थानकासमोरील रस्त्यावर करण्यात आलेल्या खोदाईमुळे वाहतुकीची कोंडी आणि नागरिकांची गैरसोय वाढली आहे. नगरपालिका प्रशासनाची कोणतीही अधिकृत परवानगी न घेता केवळ नगरपालिकेचे बांधकाम सभापती कपिल शिर्के यांच्या तोंडी आदेशावरून महानगर गॅस कंपनीने रस्त्याची खोदाई केल्याचे कंपनी व्यवस्थापनाने सांगितले.
मध्यवर्ती बसस्थानकासमोरील रस्त्यावर जवळपास पाच ते सहा फूट खोल खोदाई करण्यात आली आहे. सणासुदीच्या काळात या परिसरात वाहनांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे रस्त्याच्या खोदाईमुळे वाहतुकीची कोंडी निर्माण होत असून नागरिक आणि वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
दरम्यान, खोदाई केलेल्या भागात केवळ भराव टाकून रस्ता पूर्ववत करण्याचा प्रयत्न झाल्यास बाहेरून दहीहंडी व गणेशोत्सवासाठी येणाऱ्या वाहनांची चाके अथवा वाहने या ठिकाणी अडकण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे संभाव्य अपघाताचा धोकाही नागरिकांनी व्यक्त केला आहे.
बांधकाम सभापती कपिल शिर्के यांच्या तोंडी आदेशावरून हे काम करण्यात आल्याने रस्त्याच्या डाव्या बाजूची मोठ्या प्रमाणात दुर्दशा झाल्याचा आरोपही नागरिकांकडून होत आहे. ऐन सणासुदीच्या काळात महत्त्वाच्या आणि वर्दळीच्या रस्त्याची अशा प्रकारे खोदाई केल्याबद्दल नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
नगरपालिका प्रशासनाने सायंकाळच्या सुमारास संबंधित काम बंद करण्यास सांगितल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, प्रशासनाची अधिकृत परवानगी नसताना रस्त्याची खोदाई करण्यात आल्याने संबंधित महानगर गॅस कंपनीवर कायदेशीर कारवाई अथवा गुन्हा दाखल केला जाणार का, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.




