
‘श्री रत्नागिरीचा राजा’च्या आगमनाने रत्नागिरी दुमदुमली
ढोल-ताशांचा गजर, गुलालाची उधळण; तरुणाईच्या उत्स्फूर्त सहभागाने आगमन सोहळ्याला रंगत
रत्नागिरी : रत्नागिरीकरांचे श्रद्धास्थान असलेल्या ‘श्री रत्नागिरीचा राजा’ गणरायाच्या आगमनाचा सोहळा रविवारी मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडला. ढोल-ताशांचा कडकडाट, गुलालाची उधळण आणि तरुणाईच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला.
या भव्य आगमन सोहळ्याला रत्नागिरीचे पालकमंत्री तथा राज्याचे उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांनी प्रमुख उपस्थिती लावत गणरायाचे मनोभावे स्वागत केले. यावेळी गणेशभक्तांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला.
दरम्यान, सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरली ‘द बॉम्बे हुपर गर्ल’ शिवानी धोपावकर. शिवानीने सादर केलेल्या हुपर कलेच्या अप्रतिम प्रात्यक्षिकाने उपस्थितांची मने जिंकली. तिच्या कलाविष्काराला विशेषतः तरुणाईकडून उत्स्फूर्त दाद मिळाली.
गणरायाच्या आगमनासोबतच पारंपरिक वाद्यांचा निनाद आणि शिवानी धोपावकरच्या अनोख्या कलेने सोहळ्याची रंगत आणखी वाढली. भक्ती, उत्साह आणि जल्लोषाच्या वातावरणात ‘श्री रत्नागिरीचा राजा’चे आगमन अविस्मरणीय ठरले







