
मृतांची संख्या ७३४ वर; ३०० हून अधिक भारतीय बेपत्ता, सलग चौथ्या दिवशी बचावकार्य युद्धपातळीवर सुरू!
नेपाळ महापूर : नेपाळमध्ये आलेल्या भीषण महापुरामुळे हाहाकार उडाला आहे. हिमनदी कोसळल्यानंतर भोटे कोशी नदीला आलेल्या अचानक पुरामुळे झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत तब्बल ७३४ जणांचा मृत्यू झाला असून सुमारे २,५०० नागरिक अजूनही बेपत्ता आहेत. बेपत्ता असलेल्यांमध्ये ३०० हून अधिक भारतीय नागरिकांचा समावेश असल्याची माहिती नेपाळचे परराष्ट्र मंत्री शिशिर खनाल यांनी दिली आहे. दुर्घटनेचा आज चौथा दिवस असून अत्यंत खडतर भौगोलिक परिस्थितीमुळे मदत आणि बचावकार्यात मोठ्या अडचणी येत आहेत.
हिमनदी कोसळल्यानंतर बर्फ आणि दगडांचा मोठा लोट नदीच्या दिशेने आला. त्यानंतर पाणी, चिखल आणि दगडांचा प्रचंड प्रवाह शहरे आणि गावांमधून वाहत गेला. या प्रवाहात घरे, वाहने, रस्ते आणि पूल वाहून गेले, तर काही प्रकल्पांचेही नुकसान झाले.
नेपाळमधील रसुवा क्षेत्रासह तीन प्रमुख जिल्ह्यांना या पुराचा मोठा फटका बसला आहे. पुराचे पाणी आणि चिखलामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक गावांचा जगाशी असलेला संपर्क पूर्णपणे तुटला आहे. नेपाळ पोलीस आणि सुरक्षा दलांकडून बाधित भागांत बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. नेपाळसोबतच लगतच्या तिबेट सीमेवरही या पुराचा तीव्र परिणाम झाला आहे.
भारतीय नागरिकांसाठी हेल्पलाइन जाहीर
काठमांडू येथील भारतीय दूतावासाने बाधित भारतीय नागरिकांसाठी आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी २४ तास कार्यरत असणारे हेल्पलाइन क्रमांक जारी केले आहेत:
काठमांडू येथील भारतीय दूतावास: +977 985 131 6807 / +977 970 910 7500
बीजिंग (चीन) येथील भारतीय दूतावास (व्हॉट्सॲप): 0086 185 1428 4905
नेपाळ पर्यटन मंडळाने पर्यटकांच्या मदतीसाठी १२३४ आणि ११४४ हे आपत्कालीन क्रमांक जारी केले आहेत. तसेच टुरिस्ट पोलीस हेल्पलाइन क्रमांक ९८५१२८९४४५ वरही संपर्क साधता येईल.
भारतीय दूतावास नेपाळ प्रशासनाच्या सतत संपर्कात असून पुरामध्ये अडकलेल्या भारतीयांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी आणि त्यांच्यापर्यंत मदत पोहोचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.



