
एसटी बस अपघातातील जखमींची आमदार भास्कर जाधवांकडून रुग्णालयात भेट
कामथे उपजिल्हा रुग्णालयात जाऊन जखमी प्रवाशांची केली विचारपूस; उपचाराबाबत घेतली माहिती
चिपळूण : चिपळूणजवळ दोन एसटी बसेसच्या समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांची उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते तथा आमदार भास्कर जाधव यांनी कामथे येथील उपजिल्हा रुग्णालयात भेट घेऊन विचारपूस केली.
चिपळूण तालुक्यातील आंबडस परिसरातील खांदाट गवळवाडी येथील चिरणी फाट्याजवळ दोन एसटी बसेसची समोरासमोर धडक झाली. या अपघातात सुमारे २१ प्रवासी जखमी झाल्याची माहिती समोर आली असून, जखमींवर कामथे येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
चिपळूणहून चोरवणेच्या दिशेने जाणारी एसटी बस आणि कासईहून चिपळूणच्या दिशेने येणारी एसटी बस धोकादायक वळणावर समोरासमोर धडकल्या. धडक इतकी जोरदार होती की दोन्ही बसेसमधील प्रवासी जखमी झाले. अपघातानंतर जखमींना तातडीने उपचारासाठी कामथे उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच आमदार भास्कर जाधव यांनी तातडीने कामथे उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली. त्यांनी जखमी प्रवाशांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. तसेच डॉक्टरांकडून जखमींच्या उपचाराबाबतची माहिती घेत आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्याबाबतही चर्चा केली.
अपघातातील जखमी प्रवाशांना तातडीने आणि योग्य उपचार मिळावेत, यासाठी आवश्यक ती सर्व मदत करण्यात येईल, अशी भूमिका यावेळी आमदार जाधव यांनी व्यक्त केली.




